धुळे (योगेश जाधव) । जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळा डिजिटल झाले आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला लोकसहभागातून शाळा डिजिटल करण्यात यश आले आहे. एकिकडे शाळा डिजिटल होत असतांना दुसरी कडे मात्र त्याच काही शाळाची दुरावस्था झाली आहे. शिक्षण विभागाचे अधिकारी मात्र याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष करत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. याविषयी पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. धुळे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 1103 शाळा आहेत. या शाळांमध्ये एकूण 4 हजार 107 वर्ग खोल्या आहेत. या जिल्हा परिषदेच्या शाळांमधून 90 हजार 989 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
जीर्ण वर्ग खोल्यांची दुरूस्ती करा
शिक्षण विभागाने सप्टेंबर महिन्यात झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत या जिल्ह्यांतील 198 वर्ग खोल्या जीर्ण झाल्याचा अहवाल मांडला होता. या खोल्या दुरुस्तीची गरज असल्याचे अहवालात नमूद केले होते. यात धुळे तालुक्यात 55, साक्री तालुक्यात 66, शिंदखेडा तालुक्यात 17 तर शिरपूर तालुक्यातील 60 वर्ग खोल्यांचा समावेश आहे. शाळा डिजिटल करणे काळाजी गरज आहे. मात्र त्याचबरोबर शाळा इमारतींची देखभाल आणि दुरुस्तीकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांना सध्या धोकेदायक इमारतीमध्ये जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावे लागत आहेत. शाळा डिजिटल करण्यासाठी लाखोचा निधी लागतो. त्यामुळे शाळा डिजिटलबरोबरच जीर्ण झालेल्या वर्ग खोल्यांची दुरुस्तीही करणे गरजेचे आहे.
ग्रा.पं.च्या सूचनांकडे दुर्लक्ष
शाळेतील जीर्ण वर्ग खोल्यांबाबत संबंधित गावाच्या ग्रामपंचायतींनी तक्रारी करूनही अद्याप त्याकडे पाहिजे त्या प्रमाणात लक्ष देण्यात आलेले नसल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे.
वर्ग खोल्या बनल्या धोकादायक…
जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळा डिजिटल झाल्या असल्या तरी शाळांच्या वर्ग खोल्या धोकादायक झालेल्या आहेत या डिजिटल शाळांमधील तब्बल 198 वर्ग खोल्या धोकादायक स्थितीत असल्याच्या शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीमुळे हे वास्तव समोर आले आहे.जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळा डिजिटल झाल्या असल्या तरी शाळांच्या वर्ग खोल्या धोकादायक झालेल्या आहेत. काही शाळांचे छत धोकेदायक झालेले आहे, काही शाळांच्या वर्ग खोल्या गळक्या आहेत, तुटलेल्या आहेत.