डिजिटल ‘स्मार्ट‘ युगात अ‍ॅप्सची भुरळ अन् प्रभाव!

0

एवढेच नाही तर आपल्या उत्पादनाशी खेळवून ठेवण्यासाठी विविध अ‍ॅप्सची निर्मिती केली जात आहे. स्मार्टफोनच्या, डिजिटल युगात अशा अ‍ॅप्सची भुरळही अनेकांवर पडत आहे. अन् प्रभावही वाढत आहे. मोबाईल हे केवळ संवादाचे माध्यम राहिले नसून, स्मार्टफोनमुळे आता वाणीसामान खरेदी करण्यापासून बँकिंग व्यवहारापर्यंत प्रत्येक कामासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर सर्रास होऊ लागला आहे. यामुळे ग्राहकांचे पैसे, वापरकर्त्यांचे वेळ आणि कष्ट वाचताहेत.

आर्थिक व्यवहार करणे झाले सोपे
डिजिटल युगात बँकेचे व्यवहार करणे कधी नव्हे एवढे सोपे झाले आहेत. ही सहजता आली आहे, आधुनिक तंत्रज्ञानामुळे. ज्याला पैसे पाठवायचे आहेत ती व्यक्ती अगदी शेजारच्या घरात राहणारी असो वा सातासमुद्रापार, व्यवहार काहीशे रुपयांचा असो वा लाखोंची उलाढाल. घरबसल्या काम होते. बँकेत जाण्याची गरज जवळपास संपली आहे. रोख व्यवहारांसाठी उत्तम पर्याय इंटरनेट बँकिंग हा आहे. बँक खाते एकदा का आधार कार्डशी संलग्न झाले की आधार कार्डच्या साहाय्याने आर्थिक व्यवहार करू शकतो. फक्त त्यासाठी ज्याच्याशी व्यवहार करायचा आहे, त्याचे खातेही आधारसंलग्न असायला हवे. ज्याला पैसे पाठवायचे आहेत, ती व्यक्ती आधार क्रमांक आणि रक्कम नमूद करते. बोटांचे ठसे देऊन व्यवहार अधिकृत असल्याची खात्री पटवली की नमूद केलेली रक्कम तुमच्या खात्यावरून वजा होईल आणि संबंधित व्यक्तीच्या खात्यात जमा होईल. त्याचप्रमाणे क्यूआर कोड हा पैसे भरण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आहे. स्मार्ट फोनच्या साहाय्याने क्यूआर कोड स्कॅन करून पैसे भरता येतात. त्यासाठी खाते ज्या बँकेत आहे, त्या बँकेचे अ‍ॅप डाउनलोड करून ठेवावे लागते. त्याच्या साहाय्याने एक व्हर्चुअल कार्ड तयार केले की ते स्कॅन करून वापर सुरू करता येतो. अर्थात बँकीगशी निगडीत अ‍ॅप्समुळे आर्थिक व्यवहार करणेही सुकर झाले आहे. एवढेच नाही तर एखाद्या कंपनीचे संकेतस्थळ किंवा अ‍ॅप हे कंपनीच्या उत्पादनाच्या ब्रॅण्डच्या प्रसाराचे मोठे माध्यम ठरू लागले आहे. भारतातील 30 कोटी स्मार्टफोनधारकांची संख्या लक्षात घेता, विपणन क्षेत्रातील मंडळी वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठमोठे डिजिटल बजेट ठरवू लागले आहेत. डिजिटल माध्यमांवर गेल्या काही वर्षांत वाढलेला खर्च पाहता, ही गोष्ट अधोरेखित होते. परंतु, डिजिटल माध्यमातून जाहिराती करून आपल्या ‘टार्गेट’ ग्राहकाकडे पोहोचण्यात कंपन्या यशस्वी ठरत आहेत का, हाही प्रश्न उपस्थित होत आहे. डिजिटल माध्यमांमुळे एका विशिष्ट वर्गाला आपल्याकडे आकर्षित करता येणे शक्य आहे. मात्र यातून मिळणार्‍या यशाचे मोजमाप करणे अशक्य आहे. सध्याच्या परिस्थितीत डिजिटल माध्यम प्रभावीदेखील ठरू लागले आहे. वेबसाईट किंवा अ‍ॅप्स या माध्यमातून उत्पादनाची माहिती सर्वत्र पोहोचवता येते. या माध्यमामुळे वापरकर्त्यांची माहिती अन्य डिजिटल माध्यमांच्या तुलनेत कमी खर्चात मिळू लागली आहे. वापरकर्त्यांसाठी वेबसाइट किंवा अ‍ॅप म्हणजे आकर्षक वस्तू जिंकवून देणारी एक स्पर्धा असते. परिणामी ग्राहकांचाही याकडे ओढा वाढत जातो. सध्या हा कल पूर्णपणे रुजलेला नसला तरी तरुणवर्गाला ‘लक्ष्य’ करण्यात तो यशस्वी होत आहे. विशेषत: अशा प्रकारच्या स्पर्धांची ‘माऊथ पब्लिसिटी’अधिक होते. भारतात जिथे निम्मी लोकसंख्या 25 पेक्षा कमी वयोगटातील आहे आणि 65 टक्के लोकसंख्या 35च्या आतील वयोगटातील आहे, तिथे अशा प्रकारचा प्रसार कंपन्यांना उपयोगी ठरू शकतो. भारतीय लोकांच्या गेम खेळण्याच्या सवयींवर असलेल्या एका अहवालानुसार 65% पुरुष आणि 35% महिला सरासरी महिन्याचे 7 तास मोबाईलवर गेम खेळण्यात घालवतात. संशोधन पुढे असे दर्शवते की पुरुष दरमहा 8.5, तर महिला दरमहा 6 तास मोबाइलवर गेम खेळतात, यातले सर्वाधिक 35 टक्के 25 ते 34 वयोगटातील तरुण आहेत. अशा परिस्थितीत स्पर्धा किंवा गेमवर आधारित अ‍ॅप्स हे प्रभावी माध्यम ठरेल, यात शंका नाही.
सुनील आढाव – 7767012211