डिजिधन अभियानाची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

0

भुसावळ। डिजिधन अभियानाबाबत जनजागृतीसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सर्व महाविद्यालये उच्च शिक्षण संस्थांना सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पथकाने भीम अ‍ॅप, यूपीआय, यूएसडी, इंटरनेट बँकिंग, क्रेडिट-डेबिट कार्डाच्या वापराबाबत जनजागृती केली.

यांनी केले सहकार्य
महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ.गिरीश कुलकर्णी यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. प्रा.धीरज अग्रवाल, प्रा. धीरज पाटील, सुनीलसिंह चौधरी, विजय विसपुते यांनी सहकार्य केले. महाविद्यालयाचा आस्थापना विभाग तसेच उपाहारगृहात कॅशलेस व्यवहारांवर भर देण्यात आला. अभियानातील उत्स्फूर्त सहभागाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोशल मीडिया टीमने महाविद्यालयाचे कौतुक केलेले आहे.

संधीचा फायदा घ्यावा
’डिजिधन’ अभियानाचे राज्य समन्वयक स्वप्निल पुरी यांनी महाविद्यालय परिसरातील आर्थिक व्यवहारांसाठी ’कॅशलेस’ची सुविधा उपलब्ध करून दिली. शासनाने सोशल मीडियावर दिलेले शुभेच्छापत्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिंह यांच्या हस्ते ’डिजिधन’ जनजागृती टीमच्या सदस्यांना दिले. त्यामुळे सदस्यांमध्ये उत्साह जाणवला. आगामी काळात इलेक्ट्रॉनिक्स किंवा डिजिटल चलनाचाच वापर होणार आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स वित्तीय व्यवहारांची मोठी बाजारपेठ खुली होत असून, भावी अभियंत्यांनी या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ.आर.पी. सिंह यांनी केले. शासनाचे शुभेच्छापत्र प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह यांनी टीमला दिले.