डिजीटल अंगणवाडीसाठी प्रयत्न करा

0

जळगाव। प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत ज्या प्रमाणे ‘डिजीटल शाळा’ करण्यासाठी जी चळवळ सुरू झाली आहे. त्याच धर्तीवर ‘डिजीटल अंगणवाडी’साठी देखील प्रयत्न व्हायला हवे तसेच डिजीटल अंगणवाडी करण्याकरिता विशेष पुढाकार घ्यावे तसेच स्पोकन इंग्लिश हा कार्यक्रम राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये सुरू असून अंगणवाडीतील चिमुकल्यांना देखील इंग्रजी भाषा परिचित व्हावी, यासाठी आवश्यक त्या सोयी -सुविधा अंगणवाड्यांमध्ये उपलब्ध करण्यात याव्यात, असे निर्देश शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महिला व बालकल्याण विभाग यांच्यातर्फे जिल्हा परिषदेला देण्यात आले आहेत. अंगणवाडी केंद्रांमार्फत 3 ते 6 या वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देण्यात येते, तथापी वय वर्ष 6 पूर्ण झाल्यानंतर पहिल्या वर्गात शाळेत प्रवेश घेण्यासाठी अंगणवाडी केंद्रातील मुले शैक्षणिकदृष्ट्या परिपूर्ण झाल्याचे बर्‍याच वेळा दिसून येत नाही.

कार्यक्रमात समाविष्ट करा
अंगणवाडी केंद्राजवळील जि.प. प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी आठवड्यातून किमान एकदा शाळेजवळील अंगणवाडी केंद्रांना भेट देवून पूर्ण बालशिक्षण व संगोपनच्या कामावर लक्ष केंद्रीत करावे व या बाबत संबंधित अंगणवाडी सेविकेला मार्गदर्शन करावे तसेच शाळेत साजर्‍या होणार्‍या विविध उत्सव, समारंभ जसे – 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आदी कार्यक्रमांच्या वेळी अंगणवाडीतील चिमुकल्यांना बोलवून त्यांना या कार्यक्रमात समाविष्ट करुन घ्यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

साध्य करण्यासारखे
प्राथमिक शिक्षण व अंगणवाडी विभाग यांना शिक्षणाच्या मुद्दयावर एकत्रित आणून बरेच काही साध्य करणे शक्य आहे, हे लक्षात घेवून अंणवाडीतील चिमुकल्या बालकांना ‘स्पोकन इंग्लिश’ हा कार्यक्रम राबवून इंग्रजी भाषेचे ज्ञान दिले जाणार असल्याचे संयुक्त परिपत्रक निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. तसेच अंगणवाडी केंद्रातून सहा वर्षे पूर्ण झालेली मुले शाळेतील पहिल्या वर्गात जाण्यासाठी पात्र असावीत याकरीता कार्यपध्दती व उपाययोजना निश्चित करण्यात आल्या आहेत.

‘आकार’ अभ्यासक्रम
अंगणवाडी केंद्रातील 3 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांसाठी विद्या प्राधिकरण पुणे यांच्या समन्वयाने पूर्ण शालेय शिक्षणासाठी ‘आकार’ अभ्यासक्रम विकसित करण्यात आला आहे. अभ्यासक्रम शिकविण्यासाठी अंगणवाडी सेविकांना स्थानिक पातळीवरील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी मदत करावी, प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी अंगणवाडी सेविकेला प्राथमिक शिक्षण स्तरावरील शैक्ष्णिक गरजा विचारात घेवून मार्गदर्शन केल्यास हा अभ्यासक्रम शिकविण्यास सर्व सेविका सक्षम होतील.

प्रमाणपत्र द्यावे
प्रत्येक वर्षी वार्षिक परीक्षा संपल्यानंतर अंगणवाडी केंद्रातील 3 ते 4 वर्ष, 4 ते 5 वर्ष व 5 ते 6 वर्ष या वयोगटाप्रमाणे आकार अभ्यासक्रम पूर्ण केल्याबाबतची खात्री अंगणवाडी केंद्राजवळील जि.प.च्या शिक्षकांनी करावी व त्याप्रमाणे त्यांनी प्रामाणित करावे व ज्या मुलांनी वरील तिन्ही वयोगटाकरिता असलेला ‘आकार’ अभ्यासक्रम पूर्ण केला आहे, अशा मुलांना प्राथमिक शाळेचे शिक्षक व अंगणवाडी सेविका यांच्या संयुक्त स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देण्याचे सांगण्यात आले आहे.