डिजीटल प्लॅटफॉर्मद्वारे प्रशासनाने नागरिकांना चांगल्या सेवा द्याव्यात

0

मुंबई । सामान्यांना चांगल्या सेवा देण्यासाठी अधिकारी, कर्मचार्‍यांनी डिजीटल प्लॅटफॉर्मचा वापर करण्याचे आवाहन मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी केले. मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने नागरी सेवा दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रसायन तंत्रज्ञान संस्थेचे कुलगुरू डॉ. जी. डी. यादव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डी. के. जैन, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, मुख्य सचिवांचे सहसचिव राजीव निवतकर तसेच मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. स्वातंत्र्यानंतर 70 वर्षाचा कालखंड पाहता देशाने प्रगती केली आहे. राज्याचे दरडोई उत्पन्न वाढले आहे. बाल मृत्यूदर कमी झाला आहे, अन्य क्षेत्राचा देखील विकास झाला आहे.

नागरिकांना चांगल्या सेवा पुरवल्या पाहिजेत
विकास प्रक्रियेत प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचार्‍याच्या सहभागामुळे देश आणि राज्य पुढे आले आहे. एवढ्यावरच न थांबता कामाचा वेग वाढवून देशाला अधिक विकसित करण्यासाठी नागरिकांना चांगल्या सेवा पुरवल्या पाहिजेत, असे मल्लिक यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना रसायन तंत्रज्ञान संस्थेचे कुलगुरू डॉ. जी. डी. यादव म्हणाले, प्रशासनामध्ये ई-गव्हर्नंसचा वापर करून चांगल्या सोयी-सुविधा समाजाला उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे. प्रशासनामध्ये काम करत असताना वेगळ्या कौशल्य पद्धतीचा वापर करून चांगल्याप्रकारे काम करता येईल.

ज्ञान समाजोपयोगी असले पाहिजे
विद्यापीठ प्रशासन व्यवस्थेबद्दल सांगताना ते पुढे म्हणाले, विद्यापीठाला स्वायत्तता देण्यात यावी. त्यामुळे विद्यापीठाने देशाच्या विकासात हातभार लागेल तसेच या माध्यमातून नवीन ज्ञान निर्माण करुन हे ज्ञान समाजोपयोगी असले पाहिजे आणि या ज्ञानाच्या माध्यमातून समाजप्रबोधन होऊन समाजाला याचा लाभ झाला पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. ई-गव्हर्नंसचा वापर करून रसायन तंत्रज्ञान संस्थेने केलेली प्रगती पाहता या तंत्रज्ञानाचा प्रशासनात योग्य वापर झाल्यास समाजाला आणि प्रशासनाला निश्‍चितच लाभ होईल, असेही ते म्हणाले.