डिजीटल वर्गाचे उद्घाटन व गांधी चित्रप्रदर्शन

0

शिंदखेडा। तालुक्यातील निरगुडी येथील जि.प. मराठी शाळेत गांधी तत्वज्ञान केंद्रातील गांधी चित्र प्रदर्शन आणि डिजीटल वर्गाचे लोकार्पण कार्यक्रम पार पडला. मुख्याध्यापिका कमला रामदास परदेशी यांच्या सेवापूर्ती सोहळ्याचे औचित्य साधून चित्र प्रदर्शन व लोकार्पण सोहळा घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गटविकास अधिकारी सुरेश शिवदे हे होते. कार्यक्रमास पं.स. माजी सभापती प्रा. सुरेश देसले, नाना सोनवणे, अनिल वानखेडे, महारू पाटील, पं. स. सदस्य नानाभाऊ सोनवणे, पी. बी. मोरे, निरगुडीचे सरपंच गुलाब पाटील, उपसरपंच खडकसिंग गिरासे, शिंदखेडा नगरसेवक उल्हास देशमुख, उपनगराध्यक्ष दिपक देसले, शाळा समितीचे अध्यक्ष आनंदा भिल, राजधर पाटील, कमलसिंग गिरासे आदि उपस्थित होते.

डिजीटल वर्गाचे उद्घाटन
प्राथमिक शाळेतील मुलांना शिक्षणाची आवड निर्माण होवून गळतीचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने जि.प. शाळा निरगुडी येथे डिजीटल वर्गाचे लोकार्पण करण्यात आले. माजी पं.स. सभापती प्रा. सुरेश देसले यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. गांधी तत्वज्ञान केंद्र धुळे यांच्या सौजन्याने निरगुडी शाळेत गांधी चित्र प्रदर्शन भरविण्यात आले. यावेळी चित्ररूपाने माहिती देण्यात आली.

मुख्याध्यापिका कमलाबाई परदेशी सेवानिवृत्त
निरगुडी जि.प. शाळेच्या मुख्याध्यापिका कमलाबाई रामदास परदेशी यांनी 32 वर्षे शिक्षिका म्हणून काम केले. प्रथमत शहादा तालुक्यातील सुलतानपुर येथे शिक्षिकेची नोकरी सुरु केली. त्यानंतर मालपूर, वाडी, शिंदखेडा, वायपूर, वरपाडा, निमगुळ येथे ज्ञानदानाचे काम करून एक वर्षापूर्वी त्यांनी निरगुडी शाळेचा मुख्याध्यापिका पदाचा कार्यभार स्विकारला होता.