राजमाता गार्डन रस्त्यावर 30 दुचाकी घसरल्या
नवी सांगवी : पिंपळे गुरवमधील शहीद भगतसिंग चौक ते राजमाता गार्डन दरम्यान रस्त्यावर डिझेल सांडले होते. सांडल्यामुळे तब्बल 30 ते 40 दुचाकी घसरून पडल्याने अनेकजण जखमी झाले. हा प्रकार बुधवारी सकाळी घडला. दरम्यान, रस्त्यावर डिझेल सांडून अपघात होत असल्याचे समजताच सामाजिक कार्यकर्ते राहुल जवळकर यांनी अग्निशमन दलाला याबाबतची माहिती दिली.
कार्यकर्त्यांची तत्परता!
सकाळची वेळ असल्याने अनेकजण कामावर, तसेच लहान मुलांची शाळा सुटल्याने अनेकजण मुलांना शाळेतून घरी घेऊन जात होते. नेमके या वेळेत रस्त्यावर अज्ञात वाहनातून डिझेल गळती होऊन रस्ता निसरडा झाल्याने अनेक दुचाकी स्लीप होऊन पडत होत्या. याबद्दल माहिती कळताच सामाजिक कार्यकर्ते जवळकर यांनी अग्निशमन दलाला कळविले. तोपर्यंत राहुल जवळकर यांनी दीपक काशिद, आशिष जाधव, राजू काशिद, संतोष काशिद, नवनाथ भिडे व भैरवनाथ मित्र मंडळ, गणेश तरुण मंडळ या कार्यकर्त्यांच्या साहाय्याने घटनास्थळी माती टाकून रस्ता कोरडा केला. अल्पावधीतच अग्निशमन दलाचे जवान हजर झाले आणि डिझेलयुक्त रस्ता पाण्याने धुवून काढला.