पुणे । घरातून बाहेर पडणारे मैलापाणी व सांडपाण्याचा पुर्नवापर डीप टँक एरेशन सिस्टीम (डिटास) या यंत्रणेचा वापर करून करता येणे शक्य आहे, अशी माहिती पर्यावरण अभियंता आणि संशोधक प्रा. राजेंद्र सराफ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
छोट्या-मोठ्या सोसायट्या, मैलापाणी प्रक्रिया केंद्रावर डीप टँक एरेशन सिस्टीमची (डिटास) ही यंत्रणा प्रभावीपणे काम करते. मैलापाण्यावर प्रक्रिया झाल्यावर गंधविरहीत शुद्ध पाण्याचा वापर शौचालय, बाग आणि गाडी धुण्यासाठी करता येणे शक्य आहे. या यंत्रणेमुळे पाण्याची 30 ते 40 टक्के बचत होणार आहे.
डीप टँक एरेशन सिस्टीमची (डिटास) निर्मिती विराज एन्व्हायरोझिंग इंडिया प्रा. लिमिटेडने केली आहे. प्रा. राजेंद्र सराफ यांच्यासह मुकुंद सराफ यांनी यावर संशोधन केले आहे. नुकतेच या संशोधनाला कंट्रोलर ऑफ पेटंट, इंडिया यांच्याकडून पेटंट मिळाले आहे. 20 ते 300 घनमीटर प्रवाहाकरता ही यंत्रणा बसविता येते.
याविषयी प्रा. सराफ म्हणाले, ही यंत्रणा उभारण्यासाठी अतिशय कमी जागा लागते. महत्त्वाचे म्हणजे यासाठी कौशल्यपूर्ण मनुष्यबळ असणेही आवश्यक नाही. त्याचबरोबर ऊर्जेची मोठी बचत होते. अतिशय कमी प्रक्रियेत आणि खर्चात मैलापाणी शुद्ध होते. पाण्याची बीओडी 5 मिली प्रतिलिटर पेक्षा कमी आहे. महिन्याला 24 हजार रुपयांच्या खर्चातून 15 टँकर इतके पाणी पुन्हा वापरले जाऊ शकते. आज एका टँकरला साधारणपणे 200 ते 600 रुपये मोजावे लागतात. पण इथे या यंत्रणेमुळे 55 रुपयांना एक टँकर पाणी मिळू शकते. सध्या 150हून अधिक यंत्रणा पुणे आणि परिसरात कार्यान्वित आहेत. त्यामध्ये मांजरी ग्रीन आणि मांजरी अनेक्स या मोठ्या सोसायट्यांचाही समावेश आहे. या यंत्रणेमुळे पूर्ण उन्हाळ्यातही टँकरची मदत न घेता सोसायटीची बाग हिरवीगार ठेवणे शक्य झाले आहे. पाण्याच्या टंचाईवर हा एक प्रभावी उपाय निर्माण झाला आहे. तसेच लवकरच याबाबतचा प्रस्ताव महापालिकेला देणार असून, त्यासंबंधित लोकांशी चर्चा करणार असल्याचे सराफ यांनी सांगितले.