डिप्लोमाच्या विद्यार्थ्याची नागपूरात आत्महत्या : कुटूबियांना मात्र घातपाताचा संशय

Bhusawal diploma student dies in Nagpur भुसावळ : नागपूरात पदविका डिप्लोमा अभ्यासिकेचे शिक्षण घेणार्‍या तरुणाचा चौथ्या मजल्यावरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेने भुसावळच्या श्रीराम नगरात शोककळा पसरली आहे. मयताच्या कुटुंबियांनी मात्र घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. योगेश विजयकुमार चौधरी (२०) असे मयत तरुणाचे नाव आहे.

कॉलेज इमारतीवरून पडल्याचा संदेश
भुसावळच्या श्रीराम नगर भागातील मृत्यूंजय मंडळाजवळील रहिवासी असणारा योगेश विजयकुमार चौधरी (२०) हा युवक नागपूरातील कॉलेजमध्ये पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रम शिकत होता. शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास तो कॉलेज इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यूमुखी झाल्याचा संदेश त्याच्याच मोबाईलवरून त्याच्या वडिलांना आल्याने कुटूंब पुरते हादरले. यानंतर त्यांनी त्या मोबाईल क्रमांकावर कॉल केला असता मोबाईल बंद आला.

कुटुंबियांनी व्यक्त केला घातपाताचा संशय
भुसावळचे माजी नगरसेवक निर्मल उर्फ पिंटू कोठारी यांनी नागपूर येथे संपर्क केल्यानंतर तरुणाने चौथ्या मजल्यावरून पडल्याने योगेशचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. दरम्यान, मयत योगेशच्या वडिलांसह आप्तेष्ट शनिवारी पहाटे नागपूर येथे पोहचले आहेत. आपल्या मुलाचे कॉलेजमधील काही जणांशी वाद झाले होते. यातून त्याचा घातपात करण्यात आल्याचा आरोप मुलाच्या वडिलांनी केला आहे. या संदर्भात आपण पोलीस स्थानकात तक्रार देणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. दरम्यान, मयत युवकाच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.