डियाजिओ कंपनीचा कारभार चव्हाट्यावर

0

बारामती । पिंपळी येथील बारामती ग्रेप इंडस्ट्रिज लिमीटेड या मद्य बनविणार्‍या युनायटेड स्पिरीटच्या डियाजिओ कंपनीच्या कारभाराविरुद्ध दैनिक जनशक्तिने 15 डिसेंबर 2017 च्या अंकात वाचा फोडली होती. त्यावर अनेक शेतकर्‍यांनी प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरुवात केली. डियाजिओ या कंपनीला राजकीय वरदहस्त असल्यामुळे सुरुवातीला द्राक्ष उत्पादक शेतकरी बोलण्यास तयार नव्हते. मात्र, दैनिक जनशक्तिने या कंपनीच्या दरात खरेदी कपात विषयी वृतांत प्रसिध्द केल्यानंतर कंपनीचे वास्तव स्वरूप समोर येत आहे.

…तर आम्हाला द्राक्षे द्या
कंपनीने दरात कपात केल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यास एका एकरास 30 ते 40 हजार रुपयाचा फटका बसत आहे. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकर्‍याच्या प्रपंचास खो बसला आहे. कंपनीची उद्धटपणाची भाषा अशी आहे की, योग्य वाटले तर आम्हाला द्राक्षे द्या, अन्यथा आम्हाला द्राक्षाची गरज नाही. आम्ही तीन वर्षाचा साठा केलेला आहे. तशी आमच्याकडे क्षमता आहे, असे एका शेतकर्‍याने बोलताना सांगितले. या शेतकर्‍याने पुढे सांगितले की, आमच्यापुढे द्राक्ष बाग तोडण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. गेल्या चार पाच वर्षात कंपनीच्या या धोरणामुळे अनेक शेतकर्‍यांनी द्राक्ष बागा तोडून इतर पिके घेण्यास सुरूवात केली आहे. अगदी सुरुवातीच्या काळात खूप चांगला भाव मिळाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली. त्याचा फायदा कंपनीस होत गेला. मात्र, जास्त माल उपलब्ध झाल्यामुळे कंपनीने आपले खरे स्वरूप दाखविण्यास सुरूवात केली.

द्राक्ष उत्पादकांना झळ
कंपनीच्या या धोरणाविरूध्द आता शेतकरी उघडपणे बोलू लागला आहे. बारामतीचा राजकीय प्रभाव कमी झाल्यामुळे तसेच द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यास झळ पोहोचत असल्यामुळे अस्वस्थता पसरली आहे. याविरूध्द आता शेतकरी आपापसात बोलू लागले आहेत. ही सुध्दा महत्त्वाची घटना आहे. मात्र कंपनीकडून कोणत्याही प्रकारची याविषयीची माहिती बाहेर येऊ दिली जात नाही. तसेच कंपनीचे अधिकारी सतत मिटींगमध्ये आहेत, असे सांगितले जाते. साहजिकच गोपनियतेमुळे शेतकर्‍यांना माहितीच मिळत नाही.