डोंबिवली : लाखो प्रवाशांची वर्दळ असलेल्या कल्याण व डोंबिवली स्टेशनवरील डीलक्स प्रसाधनगृहांचे काम अंतिम टप्प्यात असताना ते गेल्या तीन महिन्यांपासून बंद पडले आहे. रेल्वेकडून या कामासाठी कंत्राटदाराला निधी दिला जात नसल्याने हे काम बंद असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. डिलक्स प्रसाधनगृह सुरू झाल्यावर कल्याण स्टेशनवरील अत्यंत दयनीय स्थितीत असलेले प्लॅटफार्म क्रमांक १वरील जुने प्रसाधनगृह पाडले जाणार आहे. मात्र काम बंद असल्याने त्याचा वापर सुरू ठेवावा लागत आहे.
तीन वर्षांआधी ठाण्यात प्रथम डीलक्स प्रसाधनगृह सुरू झाले. या प्रसाधनगृहाला कितपत प्रतिसाद मिळेल, यावरही शंका घेतली जात होती. परंतु अत्यंत स्वच्छता राखली जात असल्याने या प्रसाधनृहाला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे इतर महत्त्वाच्या स्टेशनांवरही यापुढील काळात अशीच प्रसाधनगृहे उभारण्याची योजना रेल्वेने आखली. परंतु निधीअभावी ही कामे बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.