डिलेव्हरी बॉय पार्सल द्यायला गेला अन् 27 पार्सलची बॅग लांबविली

0

रामानंद नगर परिसरातील घटना: बॅगमध्ये अॅमेझॉन कंपनीचे २० हजाराचे होते पार्सल

जळगाव: घराच्या खाली पार्सल असलेली बॅग ठेवून दुसर्‍या मजल्यावरील रहिवासी नागरिकाचे पार्सल देण्यासाठी गेलेल्या अ‍ॅमेझॉन कंपनीच्या डिलेव्हरी बॉयची बॅग लांबविल्याची घटना शनिवारी सकाळी 9.45 वाजेच्या सुमारास रामानंदनगर परिसरातील लक्ष्मीनगरात घडली. या बॅगमध्ये 20 हजार रुपये किमतीचे 27 पार्सल होते, अवघ्या 15 मिनिटात चोरट्यांनी ही बॅग लांबविल्याचे समोर आले असून प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अवघ्या 15 मिनिटात चोरट्याने लांबविली बॅग

आसोदा रोडवरील ओमनगरातील रहिवासी यश अशोक सोनार हे अ‍ॅमेझॉन कंपनीत सुमारे एक वर्षापासून कुरीयर डीलेवरीचे काम करतात. 28 रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे शिवकॉलनी स्टॉपसमोरील स्टेट बॅँकेशेजारील अ‍ॅमेझॉन कंपनीच्या कार्यालयात गेले. येथुन त्यांनी कुरीयरचे एकुण 37 पार्सल ताब्यात घेतले. व त्यांच्याजवळ असलेली कंपनीची मोठी डिलेवरीची बॅगमध्ये सर्व पार्सल ठेवले. यानंतर मोबाईलमधील कंपनीच्या अ‍ॅपवरील माहितीनुसार शहरात वेगवेगळ्या 12 ठिकाणी पार्सल पोहचविले. यश सोनार 9.45 वाजेच्या सुमारास गिरणाटाकी पसिरातील लक्ष्मीनगर प्लॉट नं. 18 येथील अंकुश बढे यांना पार्सल देण्यासाठी गेले.
वरच्या मजल्यावर राहत असल्याने सोनार यांनी बढे राहत असलेल्या तळमजल्यावर कुंपनात पार्सल असलेली बॅग ठेवली. यानंतर बढे यांना देण्यासाठी वरच्या मजल्यावर गेले, बढे यांना पार्सल देवून अवघ्या 15 मिनिटात परतले, असता त्यांची बॅग जागेवर नव्हती. इतरत्र शोधाशोध केली, मात्र मिळून न आल्याने त्यांनी तक्रारीसाठी रामानंदनगर पोलीस ठाणे गाठले. तक्रारीवरुन 27 पार्सल व मोठी बॅग असा एकूण 20 हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास रवी नरवाडे हे करीत आहेत.