बंगळूर । पाठीच्या दुखापतीमुळे धडाकेबाज फलंदाज ए.बी.डिव्हिलियर्स शनिवारी होणार्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूर च्या दुसर्या सामन्यातही खेळण्याची शक्यता कमी आहे. तसेच, यंदाच्या स्पर्धेत डिव्हिलर्स यष्टिरक्षण करणार नाही, हेदेखील संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. कर्णधार विराट कोहलीच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यातून तो देखील अद्याप पूर्ण तंदुरुस्त झालेला नाही. त्यामुळे ’आयपीएल’च्या सुरवातीच्या काही सामन्यांमध्ये तो खेळणार नाही, हे स्पर्धेपूर्वीच स्पष्ट झाले होते.
त्याच्या अनुपस्थितीत रॉयल चॅलेंजर्सचे नेतृत्व डिव्हिलर्सकडे सोपविण्यात येणार होते. मात्र, तोही दुखापतग्रस्त असल्याने अखेर शेन वॉटसनला कर्णधारपदी नियुक्त करण्यात आले. डिव्हिलर्सने गुरुवारी संघाबरोबर सराव केला. त्यानंतर तो म्हणाला, क्रिकेटच्या मैदानावर परतण्यास मी आतूर आहे. पण 100 टक्के तंदुरुस्त झाल्याशिवाय हा निर्णय घेऊ शकत नाही. कारण पूर्ण तंदुरुस्त नसताना खेळण्याची घाई केली, तर त्यामुळे पुन्हा दुखापत होऊ शकते.” यंदाच्या स्पर्धेला सुरवात होण्याआधीपासूनच बंगळूरच्या संघाला दुखापतींचा फटका बसला आहे. कोहली, वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क आणि सलामीवीर-यष्टिरक्षक के. एल. राहुल दुखापतीमुळे सध्या संघाबाहेर आहेत. यामुळे सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात केदार जाधवकडे यष्टिरक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली. अर्थात, केदार जाधवने आतापर्यंतच्या त्याच्या कारकिर्दीतील 263 सामन्यांपैकी केवळ 24 सामन्यांमध्ये यष्टिरक्षण केले आहे.