पिंपरी-चिंचवड : कर संकलन विभागाने गेल्या 15 दिवांपासून थकबाकीदारांवर कठोर कारवाई सुरु केली आहे. 16 थकबाकीदारांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून 1.54 कोटींची वसूली करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षांत डिसेंबर अखेरपर्यंत मालमत्ता करातून 311.60 कोटींचा महसूल पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे, अशी माहिती सहआयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.
कर भरण्यासाठी निगडी ते बोपखेल सुविधा
शहरात सव्वा चार लाखांच्या आसपास मिळकती आहेत. या मिळकतींना महापालिकेतर्फे कर आकारणी केली जाते. मिळकत भरण्यासाठी पालिकेने 16 ठिकाणी सोय उपलब्ध करुन दिली आहे. निगडी, आकुर्डी, चिंचवड, थेरगाव, सांगवी, पिंपरी वाघेरे, पिंपरीनगर, पालिका भवन, फुगेवाडी, भोसरी, चर्होली, मोशी, चिखली, तळवडे, किवळे आणि दिघी बोपखेल या ठिकाणी मिळकत कर भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
दोन टक्के सवलतीमुळे ऑनलाईनला प्राधान्य
31 डिसेंबर 2017 अखेर दोन लाख 38 हजार 546 मिळकतधारकांनी 311.60 कोटी मिळकत कराचा भरणा केला आहे. ऑनलाईन कर भरण्याची सुविधा पालिकेने उपलब्ध करुन दिली आहे. या सुविधेला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून दिवसें-दिवस ऑनलाईन कर भरणा-यांची संख्या वाढत आहे. डिसेंबर अखेर एक लाख एक हजार 12 करदात्यांनी 112.52 कोटी रुपयांचा कर ऑनलाईन पद्धतीने भरला आहे. मिळकतधारकांनी महापालिकेच्या ऑनलाईन पेमेंट सुविधेद्वारे मिळकत कराचा भरणा करुन चालू वर्षाचे सामान्य करातील 2 टक्के सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन, महापालिकेने केले आहे.
मोठ्या थकबाकीदारांवर जप्ती
थकबाकीसह दुसर्या सहामाहीची मिळकत कराची रक्कम भरणा करण्याची मुदत 31 डिसेंबरअखेर संपली आहे. त्यामुळे कर संकलन विभागामार्फत मोठ्या थकबाकीदारांपासून मिळकत जप्तीची कारवाई सुरु करण्यात आली आहे. मिळकतधारकांनी तात्काळ मिळकत कराचा भरणा करुन मिळकत जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन पालिकेने केले आहे. तसेच ज्या मिळकतधारकांनी आजपर्यंत नवीन, वाढीव बांधकामाची करआकाराणी करुन घेतलेली नाही. त्याचबरोबर ज्या मिळकतधारकांनी वापरात बदल केलेला आहे. या मिळकत धारकांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधित करसंकलन विभागीय कार्यालयात अर्ज सादर करावा. मिळकतकर आकारणीबाबत अर्ज महापालिकेच्या संकेतस्थळावर उपब्ध आहे.