डिसेंबरमध्ये एकही चित्रपट प्रदर्शित होणार नाही!

0

पुणे । चित्रपट प्रदर्शनाच्या परवानगीसाठी किमान 68 दिवस आधी निरीक्षण मंडळाकडे पाठवायला हवा, असा नियम आहे. इथून पुढे नियमानुसारच कामकाज या परिनिरीक्षण मंडळाच्या भूमिकेमुळे डिसेंबर महिन्यात कोणताही नवीन चित्रपट प्रदर्शित होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. देशभर सुरू असलेल्या पद्मावती चित्रपटाच्या वादामुळे मनोरंजननगरी चांगलीच अडचणीत आली आहे. ‘पद्मावती’ चित्रपटाला मंडळाचे प्रमाणपत्र मिळालेले नाही आणि त्याचे कारणही मंडळाने स्पष्ट केलेले नाही. मात्र, या वादामुळे आतापर्यंत बासनात गुंडाळून ठेवलेल्या ‘68 दिवसांचा’ नियमाची पुन्हा अंमलबजावणी करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.

आठवडाभर आधी प्रमाणपत्रासाठी…
मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या नियमाला फाटा देत चित्रपटाचे प्रदर्शन आठवडाभरावर आले असताना तो मंडळाकडे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पाठवला जातो. अनेकदा प्रदर्शनाच्या पूर्वसंध्येला किंवा एखा द्दुसरा दिवस आधी मंडळाचे प्रमाणपत्र निर्मात्यांच्या हातात पडते. हिंदीतही अनेक ‘बिग बजेट’ चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा निश्‍चित असल्या तरी प्रत्यक्ष चित्रीकरण आणि त्यानंतर ‘पोस्ट प्रॉडक्शन’चा भार आटोपता आटोपता चित्रपट अखेरच्या क्षणी मंडळाकडे पोहोचतो. अनेक वर्षे ही प्रक्रिया राजरोस सुरू आहे. मात्र, अचानक ‘पद्मावती’ चित्रपटासंदर्भात निर्माण झालेल्या वादामुळे ‘68 दिवस आधी’ हा नियम पुढे करत बोर्डाने या चित्रपटाच्या निर्मात्यांना तूर्तास कात्रीत अडकवले आहे. मात्र या नियमाचा फटका फक्त ‘पद्मावती’ चित्रपटालाच नाही तर या महिन्यात प्रदर्शित होणार्‍या ‘टायगर जिंदा है’ या सलमान खानच्या बिग बजेट चित्रपटापासून अंकुश चौधरीच्या ‘देवा’ या मराठी चित्रपटापर्यंत सगळ्यांनाच बसला आहे.

असे असतात किमान 68 दिवस
चित्रपट प्रदर्शित करण्याची परवानगी घेण्यासाठी किमान 68 दिवस आधी तो परिनिरीक्षण मंडळाकडे पाठविणे बंधनकारक असल्याचा नियम आहे. यानुसार, अर्जाची छाननी (7 दिवस), परिनिरीक्षण समिती नियुक्ती (15 दिवस), अध्यक्षांना अहवाल (10 दिवस), निर्मात्याला माहिती देणे (3 दिवस), मंडळाने सुचविलेल्या बदलांनुसार नवी प्रत निर्मात्याने देणे (14 दिवस), बदल अमलात आल्याची खातरजमा (14 दिवस), प्रमाणपत्र वितरण (5 दिवस) यानुसार एकूण 68 दिवसांची ही कालमर्यादा आहे. हा नियम 1952 च्या सिनेमॅटोग्राफ कायद्याच्या कलम 41 नुसार लागू आहे. म्हणजेच, जर चित्रपटात कोणताही बदल नसेल तर 35 दिवसांत प्रमाणपत्र मिळू शकते.

‘फुकरे 2’ व ‘टायगर जिंदा है’ यांच्या पुढेही?
‘पद्मावती’ पुढे ढकलल्याने फरहान अख्तर-रितेश सिधवानी यांची निर्मिती असलेल्या ‘फुकरे 2’ या सिक्वलपटाला आणि ‘टायगर जिंदा है’ या दोन्ही चित्रपटांना फायदा होणार होता. ‘फुकरे 2’ आधी 15 डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. त्याची तारीख 8 डिसेंबर करण्यात आली असली तरी प्रदर्शनाभोवती या नियमामुळे प्रश्‍नचिन्ह उमटले आहे. ‘पद्मावती’ला या नियमानुसार वागवण्याचा निर्णय मंडळाने घेतला तर तोच नियम ‘टायगर जिंदा है’ चित्रपटालाही लागू करावा लागेल. त्यामुळे सलमानचाच काय डिसेंबर महिन्यात प्रेक्षकांना कुठलाच चित्रपट पाहता येणार नाही, अशी भीती चित्रपट वर्तुळात व्यक्त होत आहे.