डिसेंबरमध्ये राम मंदिराची बांधणी सुरू करू – राम विलास वेदांती

0

नवी दिल्ली : विरोधी पक्षकारांशी वादग्रस्त जमिनीबाबत चर्चा करून डिसेंबरमध्ये राम मंदिराची बांधणी सुरू करू अशी घोषणा राम जन्मभूमी न्यासाचे प्रमुख महंत राम विलास वेदांती यांनी केली आहे. राम मंदिर अयोध्येत उभं राहिल तर बाबरी मशीद लखनऊमध्ये बांधली जाईल असं आश्वासनही वेदांती यांनी दिलं.

सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराच्या खटल्याची सुनावणी जानेवारीपर्यंत पुढे ढकलल्यामुळे उत्तर भारतातील संत समुदायामध्ये नाराजीचं वातावरण आहे. संत समाजाच्या वतीनं दिल्लीत आंदोलन सुरू केलं आहे, तर संसदेत विधेयक आणण्याचे आश्वासन भाजप खासदार राकेश सिन्हां यांनी दिलं आहे. त्यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही १९९२ सारखं आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

विरोधी पक्षकारांशी कोर्टाच्या बाहेर मध्यस्थी करून आम्ही मंदिर बांधणी सुरू करू असा विश्वास राम मंदिराचे कोर्टातील पक्षकार महंत वेदांती यांनी व्यक्त केला आहे. बाबरी मशीदीची नुकसान भरपाई म्हणून लखनऊमध्ये मशीद बांधली जाईल असंही त्यांनी म्हंटले आहे. वेदांती कोर्टाच्या निकालासाठी किंवा संसदेतील अध्यादेशासाठी थांबणार नसल्याचं या विधानावरून स्पष्ट झालं आहे. काही दिवसांपूर्वी मंदिर उभारणीसाठी देशभरातून मोठ्या प्रमाणात सामुग्रीही विश्व हिंदू परिषदेने अयोध्येत आणून जमा केली आहे. दरम्यान उत्तर प्रदेश सरकारने मात्र राम मंदिराचा निर्णय विचाराधीन असून जे काही होईल ते कायद्याच्या प्रक्रियेने होईल असं स्पष्ट केलं आहे.