डिसेंबरमध्ये राहुल गांधींचा राज्याभिषेक!

0

नवी दिल्ली : गेल्या अनेक अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चाविषय ठरलेल्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षीय निवडणुकांची तारीख अखेर जाहीर करण्यात आली असून, येत्या 16 डिसेंबरला अध्यक्षपदासाठी मतदान घेण्यात येणार असल्याचे काँग्रेसकडून जाहीर करण्यात आले. तसेच 19 तारखेला मतमोजणी होणार असून, नव्या अध्यक्षांची घोषणा करण्यात येणार आहे. दरम्यान, काँग्रेस पक्षाची सूत्रे राहुल गांधी यांच्या हाती देणाच्या प्रस्तावाला काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीने सोमवारी मंजुरी दिली आहे. पक्षाची सर्व सूत्रे राहुल यांच्याकडे सोपवण्यात यावेत, या मताला सर्व सदस्यांनी मान्यता दिली; परंतु पक्षाचे नवीन अध्यक्ष निवडण्याच्या सर्व प्रक्रियांचे पालन करूनच राहुल यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येईल, असेही समितीकडून जाहीर करण्यात आले आहे.

अध्यक्षपदी राहुल गांधींच्या निवडीसाठी प्रस्ताव
10 जनपथ येथील सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी सोमवारी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह पक्षाचे सर्व मुख्य अधिकारी तसेच पदाधिकारी उपस्थित होते. अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांच्या नियुक्तीविषयी यामध्ये चर्चा करण्यात आली. सोनिया यांच्यानंतर राहुल गांधी यांची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात यावी, असा प्रस्ताव या बैठकीत मांडण्यात आला. यावेळी सर्व सदस्यांनी या प्रस्तावाला मान्यता देत राहुल गांधी यांच्या नावाला आपला पाठिंबा जाहीर केला. परंतु पक्षाच्या परंपरेनुसार सर्व प्रक्रियांचे पालन करूनच त्यांची अध्यक्षपदी निवड केली जावी, असेदेखील या बैठक ठरवण्यात आले आहे. देशभरातील सर्व कार्यकर्त्यांना अध्यक्ष निवडणुकीसंबंधी 1 डिसेंबरला सूचना पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर 4 व 5 तारखेला अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील व 11 तारखेपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येतील. यानंतर उमेदवारांची अंतिम तारीख जाहीर करण्यात येणार असून, 16 तारखेला मतदान घेण्यात येणार आहे, असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.

खा. राहुल गांधी सक्षम नेते; ज्येष्ठांचे मत
काँग्रेस महासचिव अंबिका सोनी यांनी सांगितले की, गुजरात निवडणुकीचा प्रभावी प्रचार, नोटाबंदी व अन्य मुद्द्यांवर विरोधी पक्षांना मिळालेल्या यशाचे श्रेय हे राहुल गांधी यांना जाते. राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद म्हणाले, राहुल गांधी यांनी स्वत:हून सिद्ध केले आहे की ते सक्षम नेते आहेत. थोड्याच दिवसात पक्षाला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळेल. राहुल गांधी पुढे येऊन पक्षाचे नेतृत्व करतील. तर लोकसभेतील काँग्रेस पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, आम्ही सर्वजण पक्ष म्हणून राहुल गांधी यांचे अध्यक्ष म्हणून नेतृत्व स्वीकारण्यास तयार आहोत.

जीएसटी अर्ध्यारात्री लागू करता; मग अधिवेशन का लांबविता?
देशात वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू करण्यासाठी मध्यरात्री पंतप्रधान मोदी संसदेच्या सभागृहात येतात; पण अधिवेशनात विरोधकांचा सामना करण्याचे धाडस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये नाही, असे सोनिया गांधी म्हणाल्या. काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीत बोलताना श्रीमती गांधी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र डागले. मोदी सरकार इतिहासाची मोडतोड करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. सोनिया गांधी म्हणाल्या, सध्या संसदेच्या परंपरेवर टीका केली जाते. पण संसदेच्या पटलावरुन जनतेचे प्रश्न उपस्थित करण्याचे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. पण सध्या संसदीय परंपरा आणि लोकशाहीची हत्या केली जात आहे. भ्रष्टाचारापासून ते संरक्षण विभागाच्या खरेदी व्यवहारावरुन सरकारने उत्तरे दिली पाहिजेत. पण सरकार यापासून स्वत:चा बचाव करत आहे. त्यासाठीच हिवाळी अधिवेश लांबवले जात आहे. सध्या देशातील वाढती बेरोजगारी, महागाई दर, निर्यात आणि जीएसटीसारखे अनेक मुद्दे आहेत. ज्याने लाखो नागरिकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. सरकारच्या निर्णयांचा लाभ काही मूठभर लोकांनाच मिळत आहे. पण पंतप्रधान मोदी आजही खोटी आश्वासने आणि आकडेवारी सादर करण्यापेक्षा दुसरे काहीही करत नाही आहेत.

मोदींकडून इतिहासाची मोडतोड
गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळेल, अशी अपेक्षाही याबैठकीत बोलताना सोनिया गांधी यांनी व्यक्त केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर इतिहासाची मोडतोड करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. देशाच्या इतिहासातील पंडित नेहरु आणि इंदिरा गांधींचे योगदान नष्ट करण्यासाठी सुनियोजित पद्धतीने प्रयत्न सुरु आहेत. शालेय पाठ्यपुस्तकातून चुकीच्या पद्धतीने इतिहास शिकवला जात आहे, असे सोनिया गांधी म्हणाल्या.