जळगाव: जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (डीआरडीए)चे प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत असलेले सुनील गायकवाड यांचे सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास दिर्घ आजाराने निधन झाले. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. सुनील गायकवाड यांना यकृतचा त्रास होता. त्यांच्यावर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर दोन महिन्यापुर्वी गायकवाड यांच्याकडे जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा प्रभारी पदभार देण्यात आला होता. परंतु आठ दिवस काम सांभाळल्यानंतर त्यांना पुन्हा त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी मुंबई येथील ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर नाशिक येथे उपचारासासाठी दाखल केले, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.
गायकवाड यांची कारकीर्द
नाशिक येथील मुळचे रहिवासी असलेले सुनील मोतीराम गायकवाड हे जळगाव जिल्हा परिषदेअंतर्गत असलेल्या जिल्हा ग्रामीण यंत्रणा विभागात ते गेल्या दोन वर्षांपासून प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत होते. यापुर्वी त्यांनी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून चार वर्ष काम सांभाळले आहे. 1993 साली त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे वर्ग 1 या पदासाठी निवड करण्यात आली होती. अहमदनगर येथे डीआरडीएचे प्रकल्प संचालक, नाशिक, वर्धा आणि जळगाव येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, याशिवाय गटविकास अधिकारी म्हणून भुसावळ, चोपडा व सटाना येथे काम केले आहे. जळगाव जिल्हा परिषदेत ग्रामपंचायतीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी या पदावरून बढती घेवून ते अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्त झाले होते. येथून ते नाशिक येथे उपायुक्त म्हणून त्यांची पदोन्नतीवर बदली झाली होती. यानंतर त्यांची जळगाव डीआरडीए या पदावर 2018 पासून कार्यरत होते.