‘डीएमपीए’ इंजेक्शनाबाबत संभ्रमावस्था!

0

मुंबई (निलेश झालटे): भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत राज्य सरकारने महिलांसाठी मोफत गर्भनिरोधक ‘डीएमपीए’ इंजेक्शन देण्याचा उपक्रम सुरु केला आहे. `अंतरा’ नावाचे नवीन `इंजेक्टेबल गर्भनिरोधक’ (डीएमपीए) इंजेक्शन मोफत उपलब्ध करुन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सर्व सरकारी रुग्णालय व प्रसुतिगृहात हे ‘डीएमपीए’ इंजेक्शन मोफत मिळणार आहे. या ‘डीएमपीए’ इंजेक्शनाबत मात्र जनतेमध्ये संभ्रमाची अवस्था झाली असून सरकार आणि काही वैद्यकीय तज्ञांनी याचे समर्थन केले आहे मात्र राज्यभरातून अनेक डॉक्टर्स तसेच तज्ञांनी हे इंजेक्शन हानीकारक असल्याचे सांगितले आहे.

काय आहे ‘डीएमपीए’ इंजेक्शन!
प्रसूतीनंतर आणि गर्भपातानंतर 18 ते 45 वयोगटातील स्त्रियांना हे इंजेक्शन घेता येणार आहे. हे इंजेक्शन दर तीन महिन्यांनी दिले जाणार आहे. स्तनपानावर या इंजेक्शनचा कोणताही `साइड इफेक्ट’ होत नसल्यामुळे स्तनदा मातांनाही हे इंजेक्शन घेता येणार आहे. हे दीर्घकालीन तसेच अत्यंत प्रभावी गर्भनिरोधक आहे. इंजेक्शन बंद केल्यास पुन्हा गर्भधारणा राहू शकते. गर्भनिरोधकाचा वापर वाढावा आणि दांपत्याच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने `अंतरा’ हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. सर्व रुग्णालये, उपनगरी रुग्णालये, प्रसूतिगृहे, वैद्यकीय महाविद्यालये, चिकित्सालये यामध्ये हे इंजेक्शन मोफत उपलब्ध होणार आहे. जास्तीत जास्त महिला व मातांनी या इंजेक्शनचा उपयोग करावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

साईड इफेक्ट्सचा संभ्रम
गर्भनिरोधक ‘डीएमपीए’ इंजेक्शनचे साईड इफेक्ट्स आहेत त्यामुळे प्रसुतीतज्ञ हे इंजेक्शन सुचवत नाहीत असे काहींचे म्हणणे आहे. यामुळे महिलांना मासिकपाळी दरम्यान ब्लीडींग होते असेही म्हटले जात आहे. हे इंजेक्शन वापरल्यानंतर मासिकपाळीसाठी समस्या उद्भवत असून सहा महिने, वर्ष-वर्ष मासील पाळी येत नसल्याची उदाहरणे समोर आली असल्याचे सांगितले जात आहे. अनेक डॉक्टरांना नामंजूर असलेले औषध महाराष्ट्र सरकार रुग्णांच्या जीवाशी खेळून त्यांच्यावर का थोपवत आहे? यामध्ये काही आर्थिक लागेबांधे तर नाहीत ना? असे प्रश्न देखील उपस्थित केले जात आहेत.

गर्भनिरोधकाचा वापर वाढावा आणि दांपत्याच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने `अंतरा’ हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. सर्व रुग्णालये, उपनगरी रुग्णालये, प्रसूतिगृहे, वैद्यकीय महाविद्यालये, चिकित्सालये यामध्ये हे इंजेक्शन मोफत उपलब्ध होणार आहे. सर्व बाबी तपासूनच हा निर्णय घेतला आहे. याचा कुठलाही दुष्परिणाम नाही.
– डॉ. दीपक सावंत
आरोग्यमंत्री

गोळ्यांमुळे हार्मोनल असंतुलन होते. तो धोका या इंजेक्शनमध्ये नसतो. हा खरोखर चांगला उपक्रम आहे. बाकीच्या हानिकारक गर्भनिरोधकांपेक्षा हे अत्यंत चांगला उपाय आहे. हे सहज उपलब्ध होणे अत्यंत गरजेचे होते. यामुळे कमी टक्के महिलांना थोड्याफार प्रमाणात ब्लीडींग वगेरेची समस्या होऊ शकते पण हे हानिकारक नाही.
– डॉ. नंदिता पालशेतकर
मुंबई , गायनाकॉलोजिस्ट