डीएसकेंचा घोटाळा 2,043 कोटींचा

0

पुणे । बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी 2 हजार 43 कोटींचा घोटाळा केल्याचे उघड झाले आहे. डी. एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती यांच्याविरुद्ध गुरूवारी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने सुमारे 36 हजार 875 पानांचे आरोपपत्र अपर सत्र न्यायाधीश जे. टी. उत्पात यांच्या न्यायालयात सादर केले. 4 गाड्यांमध्ये भरुन हे आरोपपत्र न्यायालयात आणण्यात आले. ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डी. एस. कुलकर्णी व त्यांची पत्नी सध्या येरवडा कारागृहात आहेत. दरम्यान, एकीकडे पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असताना दुसरीकडे डीएसके यांच्या आणखी एका सहाकार्‍याला अटक करण्यात आली आहे. बुधवारी त्यांच्या भावाच्या जावयासह तिघांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे डीएसके यांचे पाय आणखी खोलात गेले आहेत.

तीनशे मालमत्ता गोठविल्या
डी. एस. कुलकर्णी, त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी आणि मुलगा शिरीष कुलकर्णी यांच्यावर ऑक्टोबरमध्ये आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर मुंबई, कोल्हापूरसह तीन शहरांत डीएसकेंवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी सहायक आयुक्त नीलेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची नेमणूक करण्यात आली होती. डीएसके व त्यांच्या पत्नीला अटक केल्यानंतर पथकाने डीएसकेंच्या घर, कार्यालयांवर छापे टाकून कागदपत्रे जप्त केली होती. या कागदपत्रांच्या आधारे पोलिसांनी डीएसकेंची 276 बँक खाती गोठवली. तर, आजपर्यंत सहा हजारांच्या जवळपास ठेवीदारांनी पोलिसांकडे तक्रारी अर्ज दिले होते. त्यातून काही कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्यांच्या तीनशे मालमत्ता गोठविल्या आहेत.

डीएसके यांच्या फायनान्स विभागाचे प्रमुख विनयकुमार बडगंडी यांना अटक
बुधवारी डी एस के यांच्या नातेवाईकांसह तीन जणांना पोलिसांनी अटक केली होती गुरुवारी त्यात अजून भर पडली असून डीएसके यांच्या फायनान्स विभागाचे प्रमुख विनयकुमार बडगंडी यांना अटक करण्यात आली. याचबरोबर डीएसके यांना कोणतीही मालमत्ता विकण्यास परवानगी यापूर्वीच नाकारण्यात आलेली आहे. बुधवारी अटक केलेले डी. एस. कुलकर्णी यांचे जावई केदार वांजपे हे पूर्वी त्यांच्याकडे कामाला होते. त्यांना त्यांच्या व्यवहाराच्या अनेक बाबी माहिती आहेत. त्यांची पत्नी सई वांजपे हिच्या नावावर डीएसके यांनी अनेक जमिनी खरेदी केल्या होत्या. त्यांना यातील अनेक व्यवहारांची माहिती आहे. तसेच डी. एस. कुलकर्णी यांच्या कंपनीतील 2007 -08 पासून जमिनीचे सर्व प्रमुख व्यवहार धनंजय पाचपोर हे पहात होते. त्यांच्या अनेक प्रकल्पांमध्ये पाचपोर यांचा महत्वाचा वाटा आहे. त्यांच्या उद्योगव्यवसायामधील प्रमुख ब्रेन पाचपोर यांचा असल्याचे सांगितले जाते. गेले काही दिवस आर्थिक गुन्हे शाखेकडून डीएसके यांच्यावरील आरोपपत्राची तयारी सुरु होती. अखेर पूर्ण छाननी केल्यावर गुरूवारी त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले. पोलिसांनी 4 गाड्यांमध्ये मिळून हे जम्बो दोषारोपपत्र न्यायालयात आणले. अपर सत्र न्यायाधीश जे. टी. उत्पात यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.