पुणे- गुंतवणूकदारांच्या फसवणूकप्रकरणी अटकेत असलेले बांधकाम व्यावसायिक डीएसके उर्फ दीपक सखाराम कुलकर्णी यांच्या जीवनावरील धडा बी. कॉमच्या अभ्यासक्रमातून वगळ्याचे आदेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे पुढील वर्षीच्या अभ्यासक्रमात हा धडा वगळण्यात येणार आहे.
प्रथम वर्ष आणि तृतीय वर्ष बीकॉमच्या अभ्यासक्रमातून डीएसकेंवरील धडा वगळण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हेमंत टकले यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे केली होती. त्यावर आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने हा आदेश काढला. सध्या कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या डीएसकेंकडून विद्यार्थ्यांनी काय बोध घ्यावा, असा सवाल आमदार हेमंत टकले यांनी उपस्थित केला होता.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एफवायबीकॉम आणि टीवायबीकॉमच्या अभ्यासक्रमामध्ये यशोगाथा या पुस्तकात डीएसकेंच्या जीवनावर एक प्रकरण आहे. यामध्ये डीएसकेंचा संघर्ष, यश, प्रेरणादायी प्रवास सांगण्यात आला आहे. २०१३ मध्ये हे पुस्तक प्रकाशित झाले होते. या प्रकरणामध्ये अनेक नामवंत लेखकांचे धडेही आहेत.