पुणे : गुंतवणूकदारांच्या ठेवी परत करण्यात अपयश आलेले व फसवणुकीचे गुन्हे दाखल झालेले डीएसके डेव्हलपर्स लि.चे सर्वेसर्वा दीपक सखाराम कुळकर्णी यांनी मंगळवारी अगदी अनपेक्षितपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याकडे धाव घेतली. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या मुंबईतील निवासस्थानी अजितदादा आले असता, डीएसके तेथे जाऊन धडकले.
या भेटीचा सविस्तर तपशील कळाला नसला तरी, तेथे उपस्थित सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी डीएसकेंनी क्राउड फंडिंगची रणनीती आखली असून, त्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन पवारांना केले आहे. पवारांनीदेखील डीएसकेंना अर्थसहाय्य करण्यास अनुकूल मत व्यक्त केले आहे. कालच मुंबई उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर डीएसकेंनी पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांकडे आर्थिक मदत मागण्याचा पर्याय निवडला असून, त्यानुसार आज ते पवारांना भेटले.