पुणे : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी त्यांचे चिरंजीव शिरीष कुलकर्णी यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली. त्याशिवाय शशांक बी. मुखर्जी यांची कंपनीच्या संचालकपदी नेमणूक करण्यात आली आहे. डीएसके समूहातील मुख्य अशा डीएसकेडीएल या कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक गुरुवारी पुण्यात पार पडली. सकाळी साडेदहा ते तीन वाजेपर्यंत चाललेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीतर्फे मुंबई स्टॉक एक्स्चेंज व नॅशनल स्टॉक एक्स्चेंजला अधिकृतरित्या कळविण्यात आले.
या बैठकीत डी. एस. कुलकर्णी यांनी कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक तसेच सीईओपदाचा राजीनामा दिला. मात्र, ते अकार्यकारी अध्यक्ष म्हणून कंपनीत कार्यरत असतील. त्यांच्या जागी बी कॉम पदवीधर असलेल्या शिरीष कुलकर्णी यांची नेमणूक करण्याला संचालक मंडळाने मान्यता दिली. त्याचबरोबर बँकिंग क्षेत्रात 44 वर्षांचा अनुभव असलेल्या शशांक मुखर्जी यांची कंपनीच्या संचालक मंडळावर नियुक्ती करण्यात आली. त्यासाठी कंपनीच्या वित्त समितीचीही पुनर्रचना करण्यात आल्याचे या पत्रात म्हटले आहे. कंपनीच्या अध्यक्ष व मुख्य वित्त अधिकारी हेमांगी कुलकर्णी यांच्या स्वाक्षरीने हे पत्र मुंबई स्टॉक एक्स्चेंजला पाठविण्यात आले आहे. दरम्यान, वारंवार प्रयत्न करूनही डी. एस. कुलकर्णी, हेमांगी कुलकर्णी व शिरीष कुलकर्णी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.