डीएसकेंचा 1200 कोटींचा घोटाळा!

0

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व डीएसके उद्योग समूहाचे अध्यक्ष डी. एस. कुलकर्णी यांच्याविरोधात गुंतवणूकदारांनी शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दाखल केली असतानाच, भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी डीएसकेंवर 1200 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करून एकच खळबळ उडवून दिली. डीएसके ग्रूपने हा घोटाळा केला असून, त्यांच्यावर त्वरित कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थ मंत्रालय आणि पीएफ आयुक्तांना पत्र लिहून तक्रारही दाखल केली आहे. डीएसकेंनी कर्मचार्‍यांच्या भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कम जमा केली नाही, असा दावाही सोमय्यांनी या पत्रात केला आहे. या संदर्भात त्यांनी ट्वीटरद्वारेही माहिती दिली.

गुंतवणूकदारांचे पैसे बुडाले, कर्जही थकीत!
डीएसके अडचणीत असतानाच भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सहमध्यवर्ती पीएफ आयुक्त, अर्थमंत्रालयाचे सचिव यांना पत्र लिहून तातडीने डीएसकेंच्या घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. या पत्रात खा. सोमय्या यांनी नमूद केले, की डीएसके ग्रूपने इपीएफ जमा केला; परंतु डिसेंबर 2016 पासून तो भरलाच नाही. गत तीन ते सहा महिन्यांपासून कर्मचार्‍यांचा पगार देण्यात आलेला नाही. इएसआयसीही अद्याप जमा करण्यात आलेला नाही. छोट्या गुंतवणूकदारांचे जवळपास 500 कोटी रुपये बुडालेले आहेत. 300 कोटींचे कर्जही थकित झाल्यात जमा आहे. ज्यांनी घरे, सदनिका यांच्यासाठी अ‍ॅडव्हान्स बुकिंग केले होते, त्यांना अद्यापही घरे मिळालेली नाहीत. त्यामुळे डीएसके उद्योग समूहाची तातडीने चौकशी करावी व डीएसकेवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही खा. सोमय्या यांनी केली. याबाबत त्यांनी ट्वीटरद्वारेही डी. एस. कुलकर्णींच्या 1200 कोटींच्या घोटाळ्याबाबत मुख्यमंत्र्यांसह अर्थमंत्रालयाकडे तक्रार केल्याची माहिती सार्वजनिक केली. तसे, पत्रही त्यांनी ट्वीटरवर टाकले.

नेमके काय आहे डीएसके घोटाळा प्रकरण?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहुचर्चित नोटाबंदीच्या निर्णयानंतर डीएसकेंच्या आर्थिक साम्राज्याचा पाया खचला असून, ते सद्या कमालीचे अडचणीत आले आहेत. त्यातच भाजपचे खा. किरीट सोमय्या यांनीदेखील या वादात उडी घेतल्यानंतर डी. एस. कुलकर्णी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मध्यमवर्गीयांच्या स्वप्नातील घरे मिळवून देणारे बांधकाम व्यावसायिक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. परंतु, डीएसकेंकडे गुंतवलेले पैसे परत मिळत नसल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. तसेच, पैसे मागण्यासाठी डीएसकेच्या कार्यालयात चकरा मारत आहेत. 2014 पासून अनेकांनी घरे बूक केली होती. परंतु, अद्यापही त्यांना घरांचा ताबा मिळालेला नाही. लोकांकडून आणखी पैसे कर्जरुपात घेण्यासाठी डीएसकेंनी आकर्षक योजनांची सुरुवात केली होती. ठेवीवर 12 टक्के व्याज देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. परिणामी, हजारो पुणेकरांनी त्यांच्याकडे पैसे गुंतवले होते. सुरुवातीला काही महिने व्याज मिळाले, परंतु नंतर लोकांना पैसे देण्यास परत करण्यास त्यांनी टाळाटाळ केली. सद्या गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे पैसे परत मागू लागले आहेत. त्यासाठी पोलिसांत तक्रारही दाखल झाली आहे. डीएसकेंच्या कंपन्यांत हजारो कर्मचारी काम करतात. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्यांचे पगारही थकलेले आहेत. तसेच, डीएसकेंनी त्यांचा पीएफही भरला नसल्याची बाब चव्हाट्यावर आली आहे.