पुणे : ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यात अपयश आल्यानंतर फसवणुकीचे गुन्हे दाखल झालेल्या दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) व त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी या दाम्पत्याला मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला असतानाच, पोलिसांनी त्यांच्या मालमत्ता सील करण्याची कारवाई सुरुच केली आहे. पुणे गुन्हे शाखेच्या आर्थिक शाखेकडे ठेवीदारांकडून तक्रारींचा ओघ सुरुच असून, तपासाअंती पोलिसांनी डीएसकेंच्या 266 मालमत्ता शोधून काढल्या होत्या. गेल्या काही दिवसांत त्यात आणखी 30 मालमत्तांची भर पडली असून, या मालमत्ता सील करण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज सादर करणार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या सूत्राने दिली. दरम्यान, 50 कोटी रुपये न्यायालयात भरण्याच्या हमीपत्रावर सद्या डीएसकेंना तात्पुरते अटकपूर्व संरक्षण प्राप्त झालेले असून, त्यांच्या जामीनअर्जावर येत्या 19 डिसेंबररोजी सुनावणी आहे. या सुनावणीत काय होते, याकडे पोलिसांसह ठेवीदारांकडे लक्ष लागलेले आहे.
मालमत्ता जप्तीसाठी पोलिसांची धावाधाव
डीएसके बिल्डर्स लि.चे सर्वेसर्वा डी. एस. कुलकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली असून, त्यांनी 4 डिसेंबरच्या सुनावणीत हमीपत्र दाखल करत, 15 दिवसांच्या मुदतीत 50 कोटी रुपये न्यायालयात भरण्याची तयारी दर्शविली आहे. त्यांच्या अर्जावर आता पुढील सुनावणी 19 डिसेंबररोजी होणार आहे. दरम्यान, या फसवणूक प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत असून, त्यांनी ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यापोटी डीएसकेंच्या 266 मालमत्ता शोधून काढल्या होत्या. तसेच, या मालमत्तांवर जप्ती आणण्यासाठी महसूल प्रशासनासह न्यायालयाकडे अर्जही केला होता. त्यानंतर गेल्या काही दिवसांत आणखी 30 मालमत्ता शोधण्यात गुन्हे शाखेला यश आले असून, त्याही सील करण्यासाठी अर्ज करण्यात येणार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठस्तरीय सूत्राने दिली. त्याबाबतचा निर्णय 19 तारखेच्या सुनावणीनंतर घेतला जाणार आहे. दरम्यान, ठेवीदारांनी थोडा संयम ठेवावा. आणखी तक्रारी दाखल करू नयेत, अशी विनंतीही डीएसकेंच्यावतीने ठेवीदारांना केली आहे. आपण सर्व ठेवी परत करणार आहोत. पैशाची जुळवाजुळव करण्यात वेळ लागत आहे, अशी विनंतीही डीएसकेंनी केली आहे.
डीएसकेंनी लिहिले ठेवीदारांना खुले पत्र
डीएसकेंनी ठेवीदारांना एक खुले पत्र लिहिले असून, आपण प्रत्येकाचे पैसे परत करणार आहोत. ज्या लोकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत, त्यापैकी काही लोकं सातत्याने खोटं पसरविण्याचे काम करत आहेत. कोणत्याही परिस्थितीत अस्वस्थ होऊ नका, आणि पोलिस तक्रारी दाखल करण्याचे थांबवा. डीएसकेंना संपविण्यासाठी मोठे षडयंत्र रचले गेले आहे. अशा परिस्थितीत मला थोडी साथ द्या. मी प्रत्येकाचे पैसे परत करणार आहे. पैशाची जुळवाजुळव होत आली आहे. लवकरच हे पैसे परत करेल, अशी विनंतीही या खुल्या पत्राद्वारे डीएसकेंनी ठेवीदारांना केली आहे. कोर्ट केसेसमुळे गुंतवणूकदार माझ्या प्रकल्पांत पैसे गुंतवण्यास पुढे येत नाहीत, अशी खंतही डीएसकेंनी व्यक्त केली आहे.