डीएसकेंची तब्बल तीन तास कसून चौकशी

0

सहाय्यक पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्तांनी केली चौकशी

पुणे : ठेवीदारांच्या फसवणूकप्रकरणी गुन्हे दाखल झालेले दीपक सखाराम कुलकर्णी उर्फ डीएसके व त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, बुधवारी चौकशीसाठी पुणे पोलिस आयुक्त कार्यालयातील सहाय्यक पोलिस आयुक्त व या गुन्ह्यांचे तपासअधिकारी नीलेश मोरे यांच्या कार्यालयात हजेरी लावली. कुलकर्णी दाम्पत्याची मोरे यांच्यासह उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी तब्बल तीन तास कसून चौकशी केली. तपासाचा भाग असल्याने काय चौकशी केली हे प्रसारमाध्यमांना सांगता येणार नाही, असे या चौकशीबद्दल एसीपी मोरे यांनी सांगितले. तर पोलिसांनी परवानगी दिली तरच बोलेन, असे डीएसके म्हणाले. दरम्यान, पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने डीएसकेंच्या मालमत्तांची यादी महसूल विभागाकडे दिल्यानंतर आता या मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्या संबंधीचे दोन प्रस्ताव तयार करण्यात आले असून, त्याची अधिसूचना लवकरच निघण्याची शक्यता असल्याची माहिती महसूल विभागाच्यावतीने देण्यात आली.

लिलावासाठी दोन प्रस्ताव तयार
पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने डीएसकेंच्या विविध कार्यालयांवर छापे टाकून त्यांच्या सर्व मालमत्तांची माहिती जमा केली होती. ही माहिती पोलिसांनी जिल्हाधिकारी यांना सादर केली होती. जिल्हाधिकारी यांनी डीएसकेप्रकरणी मावळचे विभागीय अधिकारी सुभाष भागडे यांची नियुक्ती केली आहे. भागडे यांनी सांगितले, की डी. एस. कुलकर्णी यांच्या मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया सुरु करण्यासाठी दोन प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. एका प्रस्तावात 171 मालमत्ता आणि दुसर्‍या प्रस्तावात 24 मालमत्तांचा समावेश आहे. यामध्ये रिकामे फ्लॅट, भूखंड, इमारती यांचा समावेश आहे. हे प्रस्ताव मंगळवारी गृहखात्याला सादर करण्यात आलेत, त्यात त्यांनी काही शंका उपस्थित केल्यात. त्यांचे निरसन करून पुन्हा दोन दिवसांत हे प्रस्ताव सादर केले जाणार आहेत. त्यानंतर लगेचच गृहविभागामार्फत लिलावाची अधिसूचना काढली जाणार आहे. त्यानंतर या जागांचे मूल्यांकन निश्‍चित केले जाईल. न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली या मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे. डीएसकेंच्या वेगवेगळ्या मालमत्तांवर वेगवेगळ्या बँकांचे कर्ज आहे. या बँका आपला हक्क न्यायालयापुढे सादर करू शकतील. त्यानुसार न्यायालय जो निर्णय देईल, त्यानुसार कारवाई पुढे जाणार असल्याचेही भागडे यांनी सांगितले.

पाच दिवस चालणार डीएसकेंची चौकशी
मुंबई उच्च न्यायालयाने कुलकर्णी दाम्पत्याला पुणे पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर होण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार डीएसके व त्यांच्या पत्नी हेमंती या पोलिस आयुक्तालयात सकाळी 11 वाजता हजर झाले. दुपारी एक वाजेपर्यंत सहाय्यक पोलिस आयुक्त व या गुन्ह्यांचे तपासअधिकारी नीलेश मोरे, उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी कसून चौकशी केली. या चौकशीचा तपशील देण्यास मात्र पोलिसांनी नकार दिला. कुलकर्णी दाम्पत्याची पुढील पाच दिवस अशी चौकशी केली जाणार आहे. तर 13 फेब्रुवारीला त्यांना मुंबईत उच्च न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. एकूण ठेवीपैंकी 50 कोटींची रक्कम न्यायालयात जमा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने डीएसकेंना दिले आहेत. तथापि, ही रक्कम भरण्यास डीएसके अपयशी ठरले आहेत. पुढील सुनावणीसाठी येताना पैसे घेऊनच या; त्यासाठी काहीही करा, अशा शब्दांत न्यायालयाने डीएसकेंना फटकारले आहे.