ठेवीदारांचे पैसे परत करण्यात अपयश आल्यानंतर फसवणुकीसह विविध प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आणि त्यासाठी न्यायालयीन पायरी चढलेले डीएसके उपाख्य दीपक सखाराम कुलकर्णी हे मंगळवारी प्रसारमाध्यमांसमोर आलेत. डीएसकेंवर आलेले संकट हे पूर्वनियोजित आणि काही लोकांची त्यांचा उद्ध्वस्त करण्याची खेळी आहे; ही भूमिका आम्ही यापूर्वीच मांडली होती. डीएसके संपावेत आणि पुण्याच्या बांधकाम व्यवसायात आपलेच साम्राज्य असावेत, असे काही घटक डीएसकेंच्या मुळावर उठलेले आहेत. त्याचमुळे सद्या डीएसकेंविषयी पुण्यात नकारात्मक मानसिकता निर्माण करण्यासाठी हे घटक विविधप्रकारे कामाला लागलेले दिसतात. गुंतवणूकदारांचे पैसे घेऊन डीएसके पळून गेलेले नाहीत. ते आणि त्यांचे कुटुंबीय पुण्यात आहेत. त्याचमुळे जेव्हा आरोपांची राळ त्यांच्याविरोधात उठवली गेलेली आहे; तेव्हा डीएसके लोकांसमोर येऊन आपल्यावरील आरोपांचे खंडन करत आहेत. डीएसके गुन्हेगार नाहीत; असे आम्ही ठामपणे म्हणत आहोत. आमच्या या म्हणण्यावर न्यायसंस्थाही नक्कीच शिक्कामोर्तब करेल, असे आम्हाला वाटते. परंतु, ठेवीदारांच्या ठेवी अडकून पडल्या आहेत; आणि त्या ठेवी लवकरात लवकर परत केल्या जाव्यात, असे आम्हालाही वाटते. तसे ते डीएसकेंनाही वाटतच आहे. खरे तर डीएसके हे कुणाची फसवणूक करणारे व्यक्तिमत्व नाही. ते परिस्थिती शरण आहेत; त्यांना थोडी सवड दिली तर या ठेवी परत करण्याची त्यांची आर्थिक क्षमता निश्चितच आहे. परंतु, खासदार किरीट सोमय्यांसारखे नेते जेव्हा त्यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडतात, त्यासाठी मुख्यमंत्रीही त्यांच्या दबावाला बळी पडून आपली सर्व यंत्रणा डीएसकेंविरोधात वापरतात, तेव्हा एका मराठी माणसाला उद्ध्वस्त करण्यासाठी ही सर्व यंत्रणा का कामाला लागली आहे? याचे आम्हाला आश्चर्य वाटते.
मुळात पुण्यातील डीएसकेंची मालमत्ता ही साडेनऊ हजार कोटींच्या घरात आहे. तर त्यांच्यावरील सर्व मिळून कर्ज हे दीड हजार कोटींच्या घरात आहे. त्यामुळे लोकांचे व बँकांचे पैसे देण्याइतपत पैसे डीएसकेंकडे मालमत्ता स्वरुपात गुंतलेले आहेत. मंगळवारच्या पत्रकार परिषदेतही डीएसकेंनी नेमके तेच सांगितले. प्रशासन, पोलिस आणि राजकारणी हे त्रिकुट डीएसकेंच्याविरोधात षडयंत्राला बळी पडत असेल आणि त्यासाठी गैरमराठी बिल्डरांच्या षडयंत्रात आपलाही वाटा उचलत असतील तर ती निव्वळ डीएसकेंसाठीच नव्हे तर सर्व मराठी उद्योजकांसाठी धोक्याची घंटा म्हणावी लागेल. याच पुण्यात डीएसके हे एक विश्वासर्ह नाव होते. त्यांच्याकडून घरे घेण्यासाठी लोकांच्या रांगा लागत असत. आज हा विश्वास असा कसा अचानक उडाला? सर्वच दिवस सारखे नसतात, आयुष्यात आणि व्यवसायात चढ-उतार हे ठरलेलेच असतात. आज जी परिस्थिती डीएसकेंवर आहे, तशीच परिस्थिती सर्वच बांधकाम व्यावसायिकांवर आलेली आहे. कुणाच्याच प्रकल्पांना उठाव नाही. नोटाबंदीमुळे लोकांची क्रयशक्ती कमी झालेली आहे. त्यामुळे घरे विकली जात नाहीत. अनेक प्रकल्पांची कामे थंडावलेली आहेत. नवीन प्रकल्प सुरु होण्याचे प्रमाणही घटलेले आहे. गुंतवणूकदारांनी डीएसकेंना थोडा वेळ दिला असता तर आज जो प्रश्न निर्माण झालेला आहे, तो निर्माणही झालेला नसता. कालपर्यंत डीएसकेंवर पूर्ण विश्वास असलेली माणसे आज अचानक त्यांच्यावर उलटली कशी? हाही संशोधनाचाच विषय आहे.
सातत्याने नकारात्मक बातम्यांचा पाऊस पडल्यामुळे पुण्यासह राज्यभरातील गुंतवणूकदार डीएसकेंवर साशंक आहेत. ही साशंकता दूर करण्यासाठीच कुलकर्णी दाम्पत्य सहपरिवार पत्रकारांसमोर हजर झाले. केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यामुळे घरांचे भाव निम्म्यावर आलेले आहेत. त्यामुळे जानेवारी 2017 पासून बांधकाम व्यवसायात अडथळे येत आहेत. तत्पूर्वी ऑक्टोबर 2016 पर्यंत गुंतवणूकदारांचे अडिचशे कोटी रुपये परत केले आहेत, असे त्यांनी या पत्रकार परिषदेत ठणकावून सांगितले. डीएसकेंकडे साडेआठ हजार मुदत ठेवी आहेत, त्यापैकी 90 टक्के ठेवीदार हे ज्येष्ठ नागरिक आहेत. लवकरच सर्वकाही व्यवस्थित होईल आणि सर्वांचे पैसे दिले जातील, असे त्यांनी अगदी अश्रू भरलेल्या डोळ्यांनी पुणेकरांना सांगितले आहे. आठवड्यातील प्रत्येक दिवस हा काही रविवार नसतो. बरेवाईट दिवस हे येतच असतात. वस्तुस्थिती लक्षात घेऊन डीएसकेंना थोडा वेळ दिला गेला तर या संकटातूनही ते मार्ग काढू शकतील, असा आम्हालाही विश्वास वाटतो. डीएसकेंचे प्रसारमाध्यमांसमोर ओघळलेले अश्रू हे काही नाटकी नव्हते; ते त्यांच्या हृदयातून पाझरलेले थेंब होते. या प्रत्येक थेंबातूनच त्यांची प्रामाणिकता पुणेकरांसमोर टपकली आहे. संकटे कधीच एकटी येत नसतात. ती येताना आपले सगेसोयरेही सोबत घेऊन येत असतात. व्यावसायिक प्रतिस्पर्ध्यांनी परिस्थितीचा अचूक गैरफायदा घेण्यासाठी जाळे विणलेले असतानाच त्यांच्यावर इतरही संकटे एकापाठोपाठ येत आहेत. बांधकामक्षेत्रात सद्या मंदी आहे. मागील काही महिन्यांपूर्वी त्यांचा भीषण अपघात झाला होता. त्यानंतर ठेवी परत घेण्यासाठी एकच गडबड सुरु झाली. एकदम मागितलेले पैसे, नोटाबंदी आणि ठेवीदारांनी घाईघाईने दाखल केलेल्या पोलिस तक्रारी यामुळे सद्या डीएसकेंवर संकटांचा डोंगर कोसळलेला आहे. परंतु, या संकटातूनही ते बाहेर येतील, असा आम्हाला विश्वास वाटतो. सर्वसामान्य पुणेकरांना कुलकर्णी दाम्पत्याबद्दल आजही उदंड सहानुभूती आहे; या सहानुभूतीच्या जोरावर घराला घरपण देणारा हा माणूस नक्कीच या संकटातून बाहेर येईल. शून्यातून विश्व निर्माण करताना ते कुणाच्या फसवणुकीतून उभे राहात नसते. केवळ प्रमाणिकपणा आणि सचोटीतूनच अशा प्रकारचे काम होत असते. डीएसके कुणाला फसविणारे नाहीत, तेव्हा पुणेकरांनी या माणसाला एक संधी द्यायला हवी. त्यांच्या ओघळलेल्या प्रत्येक अश्रूचा हाच अर्थ आहे.