डीएसकेंचे ‘घर’पण जाणार!

0

घराला घरपण देणार्‍या माणसावर बेघर होण्याची वेळ

पुणे : डीएसके म्हणजे ‘घराला घरपण’ देणारी माणसं, अशा जाहिरातीमुळे घराघरात पोहोचलेल्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी उर्फ डीएसके यांच्यावर आता बेघर होण्याची वेळ आली आहे. घेतलेले कर्ज फेडू न शकल्याने पुण्यातील चतुःश्रृगी भागातील त्यांच्या आलिशान बंगल्याचा लिलाव करण्याचा निर्णय सेंट्रल बँक ऑफ इंडियाने घेतला आहे. येत्या 8 मार्चला हा लिलाव होणार असून, बंगल्याची किंमत 66 कोटी 39 लाख इतकी ठेवण्यात आली आहे. ठेवीदारांच्या फसवणूकप्रकरणी डीएसके व त्यांच्या पत्नी हेमंती या सद्या अटकेत आहेत. तर डीएसके हे पोलिस कोठडीतच कोसळल्याने त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थीर असल्याचे सांगितले जात आहे.

बंगल्याचे हप्ते थकल्याने जप्ती
डीएसके यांनी सेनापती बापट रोडवरील चतुःश्रृगी टेकडीलगत आलिशान बंगला बांधलेला आहे. या बंगल्यावर डीएसकेंनी 100 कोटींहून अधिक कर्ज काढलेले आहे. मागील काही महिन्यांपासून अनेकदा बँकेने डीएसके यांच्याकडे कर्जाचे हप्ते भरण्याबाबत विचारणा केली होती. मात्र, पैसे नसल्याने त्यांनी वारंवार टाळाटाळ केली. अखेर नोटीसकाळ संपल्याने सेंट्रल बँकेने लिलावाची प्रक्रिया सुरु केली आहे. या संदर्भात एका इंग्रजी दैनिकात जाहिरातदेखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या जाहिरातीनुसार, या बंगल्याची बेस प्राईज 66 कोटी 39 लाख इतकी ठेवण्यात आलेली आहे. तसेच, 8 मार्च 2018 रोजी लिलाव ठेवण्यात आला आहे. हा बंगला किमान 75 ते 80 कोटींमध्ये विकला जाईल, अशी बँकेला अपेक्षा आहे. या शिवाय, डीएसकेंच्या बालेवाडी येथील जमिनीचा लिलाव करण्याचा निर्णयदेखील एसबीआयने घेतला आहे.

ससून की दीनानाथ : न्यायालय घेणार निर्णय
ठेवीदारांची तब्बल 230 कोटी रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळल्यानंतर पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कुलकर्णी दाम्पत्याला दिल्ली येथून अटक केली होती. पोलिस कोठडीत असताना डीएसके कोसळले व त्यांची प्रकृती बिघडलेली आहे. त्यामुळे त्यांच्यावर तूर्त ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तथापि, ससूनमध्ये पुरेशा वैद्यकीय सोयीसुविधा नसल्याने डीएसकेंना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात यावे, अशी विनंती डीएसकेंच्या वकिलांनी जिल्हा न्यायालयाकडे केली होती. परंतु, न्यायालयाने 48 तास ससून रुग्णालयात निगरानीखाली ठेवण्याचे आदेश देत, डॉक्टरांच्या पथकाकडून अहवाल मागविला आहे. हा अहवाल आल्यानंतर न्यायालय आपला निर्णय देणार आहेत. सद्या तरी गरजेनुसार, डीएसकेंना दीनानाथ मंगेशकर किंवा ससून रुग्णालय अशा दोन्हीही ठिकाणी हलवून उपचार केले जात आहेत.