डीएसकेंचे दिवस भरले; कोणत्याहीक्षणी अटक!

0

पुणे/मुंबई : ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यात अपयश आल्यानंतर फसवणुकीचे गुन्हे दाखल झालेल्या डीएसके बिल्डर्स प्रा. लि.चे सर्वेसर्वा डी. एस. कुलकर्णी व त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अटकपूर्व जामिनाचे तात्पुरते संरक्षण देताना न्यायमूर्ती ए. एस. गडकरी यांनी एकूण ठेवींच्या 25 टक्के रक्कम 19 डिसेंबरपर्यंत न्यायालयात भरण्याचे आदेश दिले होते. सुमारे 50 कोटी रुपयांची रक्कम डीएसकेंना मंगळवारी न्यायालयात भरावयाची होती. परंतु, ही रक्कम भरण्यात त्यांना अपयश आले. तसेच, ही रक्कम भरण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी अपुरा असून, आणखी मुदत देण्यात यावी, अशी विनंती डीएसकेंच्या वकिलांनी न्यायालयास केली. ही विनंती फेटाळून लावत पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी तपास संस्थांना मोकळीक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे कुलकर्णी दाम्पत्यांचे अटकपूर्व संरक्षण संपुष्टात आले असून, त्यांना कोणत्याहीक्षणी अटकेची शक्यता आहे. पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे पथक या फसवणूक प्रकरणाचा तपास करत आहेत.

वाढीव मुदतीसाठीचा अर्ज फेटाळला
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. एस. गडकरी यांच्यासमोर डी. एस. कुलकर्णी व हेमंती कुलकर्णी यांच्या अटकपूर्व जामीनअर्जावर सुनावणी पार पडली. यापूर्वी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने कुलकर्णी दाम्पत्याला ठेवीदारांच्या देणीपोटी 25 टक्के म्हणजे सुमारे 50 कोटी रुपये न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिले होते. ही रक्कम जमा करण्याबाबत डीएसकेंनी हमीपत्रही दाखल केले होते. हे पैसे जमा करण्यासाठी न्यायालयाने डीएसकेंना 15 दिवसांची मुदत दिली होती. ही मुदत मंगळवारी (दि.19) संपली असता, डीएसके न्यायालयात 50 कोटी रुपये भरू शकले नाहीत. उलटपक्षी त्यांनी 15 दिवसांचा कालावधी कमी असून, आणखी काही दिवस मुदत देण्याची विनंती न्यायालयाला केली. न्यायालयाने ही विनंती फेटाळून लावली आहे. मागील सुनावणीच्या वेळेसच न्यायालयाने 25 टक्के रक्कम आधी कोर्टात भरा अन्यथा अटकपूर्व जामीन मागण्यासाठी आमच्याकडे येऊ नका, असे डीएसकेंना बजावले होते. तरीही डीएसकेंच्या वकिलांनी वाढीव मुदतीसाठी न्यायालयाकडे अर्ज केला. हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. त्यामुळे डीएसकेंचे अटकपूर्व संरक्षण आपोआप संपुष्टात आले आहे. पुणे व मुंबई पोलिस डी. एस. कुलकर्णी व हेमंती कुलकर्णी यांना कोणत्याहीक्षणी अटक करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

डीएसकेंची चोहीकडून आर्थिक कोंडी
ठेवीदारांच्या फसवणूकप्रकरणी डी. एस. कुलकर्णी व हेमंती कुलकर्णी या दाम्पत्याविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असून, आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यासह महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्यान्वयेदेखील गुन्हे दाखल केले आहेत. डीएसके ग्रूपविरुद्ध एकूण 2600पेक्षा जास्त तक्रारी दाखल झाल्या असून, आर्थिक गुन्हे शाखेने डीएसकेंच्या 301 मालमत्ता शोधून काढत, त्या ताब्यात घेण्याचा अहवाल पुणे जिल्हाधिकारी यांना दिला आहे. तसेच, जिल्हाधिकारी यांनीदेखील पुढील कार्यवाहीसाठी प्राधिकृत अधिकार्‍याची नियुक्ती केली आहे. या शिवाय, बँकांकडून घेतलेल्या कर्जापोटी बँकांनीदेखील डीएसकेंच्या विविध मालमत्ता जप्त केल्या असून, पोलिसांनी डीएसकेंचे बँक खातेही सील केले आहेत. त्यामुळे डीएसकेंची मोठी आर्थिक कोंडी झालेली आहे. ठेवीदार व सदनिकाधारकांनी दिलेल्या पैशाची डीएसकेंनी कुठे कुठे गुंतवणूक केली आहे, याचा माग काढण्यासाठी पोलिसांनी विशेष लेखा परीक्षकांचीही नेमणूक केली असून, डीएसकेंच्या मालमत्तांचे फॉरेन्सिक ऑडिटही केले जात आहे.