डीएसकेंचे पाय आणखी खोलात!

0

पुणे : आर्थिक अडचणीत सापडलेल्या डीएसके उद्योग समूहावर अत्यंत वाईट दिवस आले असून, समूहप्रमुख डी. एस. कुलकर्णी यांचे पाय आणखी खोलात रूतत चालले आहेत. थकित पगार मिळावेत या मागणीसाठी डीएसकेच्या कर्मचारीवर्गाने कामगार आयुक्तालयाचे दार ठोठावले असून, रितसर तक्रार दाखल केली आहे. सुमारे 26 कर्मचार्‍यांनी डीएसकेविरोधात कामगार आयुक्तांकडे तक्रार दाखल केली असून, थकित पगार, अनुषंगिक देय रक्कम मिळवून द्यावी, अशी मागणी केली आहे. तसेच, काही महिन्यांपासून कर्मचार्‍यांच्या भविष्य निर्वाह निधीची (इपीएफ) रक्कम न भरल्याबद्दल भविष्य निर्वाह निधी आयुक्तांनी डी. एस. कुलकर्णी यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ईपीएफकडून डीएसके उद्योग समूहाची चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत त्यांनी पीएफ जमा केला नसल्याचे आढळून आल्याने ही तक्रार दाखल केली गेल्याचे इपीएफचे विभागीय आयुक्त अरुण कुमार यांनी सांगितले.

चौकशीत इपीएफ न भरल्याचे उघड
गतगुरुवारी भारतीय जनता पक्षाचे खासदार किरीट सोमय्या यांनी वित्त विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली होती. या बैठकीत डीएसके उद्योग समूहाने इपीएफची रक्कम कर्मचारीवर्गाच्या पगारातून कापून घेतली आहे. परंतु, ती पीएफ आयुक्तांकडे जमा केली नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच, डीएसकेसंदर्भात खा. सोमय्या यांनी यापूर्वी अर्थ मंत्रालय, मुख्यमंत्री आणि एपीएफ आयुक्त यांच्याकडे एक तक्रारही दाखल केली होती. त्या अनुषंगाने विभागीय इपीएफ आयुक्तांनी डीएसके उद्योग समूहाची चौकशी केला असता, काही महिन्यांपासून त्यांनी इपीएफची रक्कम भरली नसल्याचे उघडकीस आले. त्यानुसार, इपीएफचे विभागीय आयुक्त अरुण कुमार यांनी शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठून रितसर तक्रार दाखल केली. अशा प्रकारची तक्रार मिळाल्याची माहिती पोलिसांच्यावतीनेही देण्यात आली. डीएसकेंविरोधातील इतर प्रकरणांबाबतही लवकरच तक्रारी दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

आठ महिन्यांपासून पगार रखडले
डीएसके उद्योग समूहात काम करणार्‍या कर्मचारीवर्गाचे गेल्या आठ महिन्यांपासून पगार देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सुमारे 26 कर्मचार्‍यांनी पगार व इतर देय रक्कम मिळण्यासाठी कामगार आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. डीएसके पगारही देत नाही, आणि नोकरीही सोडू देत नाही, असे कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे. अनेक कर्मचार्‍यांना इतर ठिकाणाहून नोकरीची संधी येत आहे. परंतु, त्यांना डीएसकेकडून नाहरकत दिले जात नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. तसेच, पगार नसल्याने कुटुंबांचा उदरनिर्वाह कसा चालवावा, असा प्रश्न या कर्मचार्‍यांसमोर उभा ठाकलेला आहे. डीएसके उद्योग समूहात 500 कर्मचारी काम करत असून, त्यांचे गेल्या आठ महिन्यांपासून पगार नाहीत. त्यामुळे या कर्मचार्‍यांनी भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांच्याकडेही गर्‍हाणे मांडले होते. त्यांनीही कायदेशीर कारवाई करण्याचा सल्ला दिलेला आहे. त्यानुसार सर्वप्रथम कामगार आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.

कामगार आयुक्तांचीही डीएसकेला नोटीस
पगार नसल्याने अनेक कर्मचारी डीएसकेला सोडून चालले असून, मुंबई कार्यालयातील सर्व कर्मचार्‍यांनी एकाचवेळी राजीनामे दिले आहेत, अशी माहितीही एका कर्मचार्‍याने दिली. एकूण 500 च्या जवळपास असलेल्या कर्मचार्‍यांपैकी 150 कर्मचारी हे पगार मिळत नसल्याने सोडून गेले आहेत. तसेच, थकित पगार व इपीएफच्या रकमेसाठी त्यांनी कायदेशीर पाऊले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये सर्वाधिक कर्मचारी डीएसके डेव्हलपर्स लिमिटेडचे आहेत, असेही सांगण्यात आले. दरम्यान, 19 कर्मचार्‍यांनी दाखल केलेली तक्रार मिळाली असून, त्यानुसार डीएसकेच्या व्यवस्थापनाला नोटीस जारी करण्यात आलेली आहे. त्यानंतर आणखी सात जणांनीही कामगार आयुक्तांकडे तक्रार दाखल केलेली आहे. त्यानुसार पुन्हा नव्याने नोटीस जारी केली जाईल. या नोटिसीला काय उत्तर येते त्यावरून पुढील कायदेशीर कारवाई करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया सहाय्यक कामगार आयुक्त निखिल वाळके यांनी दिली.