डीएसकेंच्या अटकेचा बुधवारी फैसला!

0

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी उर्फ डीएसके व त्यांच्या पत्नी हेमंती यांच्याविरुद्ध ठेवीदारांकडून घेतलेल्या ठेवी परत न केल्यामुळे शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह इतर गुन्हे दाखल झाल्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. या अर्जावर सरकार पक्ष व बचाव पक्षाच्यावतीने मंगळवारी जोरदार युक्तिवाद करण्यात आला. ठेवीदारांच्या पैशाचे काय केले याची माहिती घ्यावयाची असून, त्यासाठी आरोपीचा चौकशीकामी ताबा देण्यात यावा, अशी मागणी सहसरकारी अभियोक्ते (एपीपी) सुनील हांडे यांनी केला. तर आम्ही तपासास सहकार्य करण्यास तयार असून, ठेवीदारांच्या ठेवी परत करत आहोत. तसेच, पासपोर्टदेखील पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे. त्यामुळे नियमित जामीन मंजूर करण्यात यावा, अशी विनंती डीएसकेंच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ज्ञ गिरीश कुलकर्णी यांनी केली. हा दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांनी या अर्जावरील आपला निर्णय बुधवार दुपारपर्यंत राखून ठेवत, तोपर्यंत अटक करण्यात येऊ नये, असे आदेश पोलिसांना दिले. आता बुधवारी डीएसकेंच्या अटकपूर्व जामीनअर्जावर विशेष न्यायाधीश आपला निकाल देणार आहेत.

दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद
ठेवीदारांनी दाखल केलेल्या तक्रारअर्जावरून पुणे गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागातर्फे डीएसकेंविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. या गुन्ह्यांवरून गुन्हे शाखेने डीएसकेंच्या कार्यालयांसह घरावरदेखील छापे टाकून काही दस्तावेज जप्त करण्यात आले होते. या गुन्ह्यात पोलिस अटक करण्याची शक्यता पाहाता, दीपक सखाराम कुलकर्णी उर्फ डीएसके यांच्यासह त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. शनिवारी हा अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांनी या अर्जावर मंगळवारी सुनावणी ठेवली होती. त्यानुसार, आज सहसरकारी अभियोक्ते सुनील हांडे यांनी आर्थिक गुन्हे शाखेची बाजू मांडली. ठेवीदारांच्या पैशाचे आरोपीने काय केले याचा तपास करायचा असून, त्याकामी चौकशीसाठी डी. एस. कुलकर्णी व हेमंती कुलकर्णी यांचा ताबा देण्यात यावा, यासह याप्रकरणाचे गांभीर्य अ‍ॅड. हांडे यांनी विशेष न्यायाधीशांच्या लक्षात आणून दिले. तर डीएसकेंचे वकील विधिज्ज्ञ गिरिश कुलकर्णी यांनी या युक्तिवादाला जोरदार विरोध करत, कुलकर्णी दाम्पत्य पोलिसांना तपासात सहकार्य करत असून, त्यांनी स्वतःहून आपला पासपोर्ट पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे. ठेवीपोटी डीएसके उद्योगसमूहाला 209 कोटी रुपये देणी असून, या देणीपेक्षा पाचपट अधिक मालमत्ता या उद्योगसमूहाकडे आहे. तसेच, ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याचे काम सुरुच आहे. जवळपास 1600 गुंतवणूकदारांना नियमित व्याज देण्यात आले असून, 30 कोटींच्या ठेवीही परत करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे अटक करण्याची काहीही गरज नसून, पोलिसांना तपासकामी योग्य ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाहीही अ‍ॅड. कुलकर्णी यांनी दिली. तसेच, नियमित जामीन मंजूर करण्याची विनंती न्यायालयास केली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आपला निर्णय राखीव ठेवला.

आपल्या अशिलाचे आर्थिक व्यवहार चांगले असून, त्यांनी कुणाची फसवणूक केलेली नाही. तसेच, ठेवीदारांना फसविण्याचाही त्यांचा कोणता इरादा नाही. ठेवीदारांच्या ठेवी परत देण्याची प्रक्रिया सुरुच आहे. तसेच, त्यांनी स्वतःहून आपला पासपोर्ट तपास यंत्रणेकडे सुपूर्त केलेला आहे. त्यामुळे त्यांच्या अटकेची मागणी ही चुकीची असून, ते पोलिसांना तपासकामी सहकार्य करण्यास तयार आहेत.
– अ‍ॅड. गिरिश कुलकर्णी, ज्येष्ठ विधिज्ज्ञ व डीएसकेंचे वकील