बचाव पक्षाचा युक्तिवाद पूर्ण
पुणे : गुंतवणूकदारांची कोट्यवधीची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या प्रसिद्ध बांधकाम व्यावयासिक दीपक सखाराम कुलकर्णी उर्फ डीएसके व त्यांच्या पत्नी हेमंती या दाम्पत्याच्या जामीनअर्जावर बचाव पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. मात्र, सरकारी पक्षातर्फे युक्तिवादासाठी दोन दिवसांची मुदत मागण्यात आल्याने या जामीनअर्जावर गुरुवारी (दि. 26) विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणी जामिनासाठी अर्ज दाखल केल्यानंतर मंगळवारी युक्तीवाद झाला होता. यात बचाव पक्षाच्यावतीने अॅड. श्रीकांत शिवदे यांनी डीएसके यांच्यावतीने बाजू मांडताना त्यांना जामीन देण्याची मागणी केली. सरकारी पक्षाच्यावतीने अॅड. प्रवीण चव्हाण यांनी युक्तीवाद दाखल करण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी मागितला होता.
नागरिकांचा डीएसकेंवर विश्वास : बचाव पक्ष
गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके दाम्पत्याला आर्थिक गुन्हे शाखेने दिल्ली येथून अटक केली होती. त्यानंतर त्यांना शिवाजीनगर न्यायालयामध्ये हजर केले असता, प्रथम त्यांची पोलिस कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली. त्यानंतर त्यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण, तर बचाव पक्षातर्फे अॅड. श्रीकांत शिवदे काम पाहात आहेत. नागरिकांचा डीएसकेंवर विश्वास आहे. व्यवसाय पूर्ववत करून सर्वांचे पैसे परत देण्यात येतील. डीएसके हे गुंतवणूकदारांकडून 1989 पासून ठेवी स्वीकारत असून, 2016 पर्यंत व्याज नियमितपणे परत दिले जात होते. त्यांना जामीन द्यावा, असा युक्तिवाद डीएसकेंचे वकील अॅड. शिवदे यांनी केला. सरकारी वकिलांनी युक्तिवादासाठी मुदत मागितल्याने या अर्जावर गुरुवारी (दि. 26) अंतिम सुनावणी होत आहे.