शिरूर । प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांच्या जामीन अर्जावर 13 मार्चरोजी सुनावणी होणार आहे. विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांच्या कोर्टात ही सुनावणी होणार आहे. याप्रकरणी सरकार पक्षाने म्हणणे मांडण्यास वेळ मागितला आहे.
सरकार पक्षाने मागितली मुदत
गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके आणि त्यांच्या पत्नी हेमंती या दोघांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. कोर्टाने सुरूवातीला दोघांना पोलिस कोठडी, त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर डीएसकेंनी जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सोमवारी सुनावणी होणार होती. मात्र, सरकारी पक्षाने जामीनअर्जावर म्हणणे मांडण्यास मुदत मागितली. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी 13 मार्च रोजी होणार आहे.
साडेसहा कोटीसाठी सरकार पक्षाचा दावा
ठाणे येथील प्रॉपर्टीच्या एका प्रकरणात डीएसकेंना 6 कोटी 55 लाख रुपये मिळणार आहेत. गुंतवणूकदारांचे देणे देण्यासाठी ही रक्कम ताब्यात मिळावी, असा अर्जही डीएसकेंचे वकील अॅड. चिन्मय इनामदार आणि अॅड. अप्रमय शिवदे यांनी कोर्टात केला आहे. यावर मुंबई पोलिसांना ही रक्कम हवी असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त आणि या प्रकरणाचे तपास अधिकारी नीलेश मोरे यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर येथील कोर्टात आम्ही प्रथम अर्ज केला आहे. त्यामुळे ती रक्कम पुण्यातील ठेवीदारांना मिळावी, असे म्हणणे डीएसकेंच्या वकिलांनी मांडले आहे. या अर्जावरही 13 मार्च रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.