डीएसकेंच्या दिल्लीत मुसक्या आवळल्या; 23 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी!

0

उच्च न्यायालयाचे अटकपूर्व संरक्षण संपताच पुणे आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

पुणे : ठेवीदारांच्या अंदाजे 230 कोटींच्या फसवणूकप्रकरणी डीएसके डेव्हलपर्स लि.चे सर्वेसर्वा व पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी उर्फ डीएसके आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी पहाटे दिल्ली येथे अटक केली. कालच मुंबई उच्च न्यायालयाने डीएसके यांची अटकपूर्व जामिनासाठीची याचिका फेटाळून लावली होती. ही याचिका फेटाळताच सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी म्हणून कुलकर्णी दाम्पत्य दिल्लीला गेले होते. त्यांना पुढील काहीही हालचाल करण्याची काहीही संधी न देता, पुणे पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या व त्यांना पुण्यात आणण्यात आले. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास डीएसके व हेमंती कुलकर्णी यांना पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधीश जे. टी. उत्पात यांच्यासमोर हजर करण्यात आले. दोन्हीही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीशांनी कुलकर्णी दाम्पत्याला पाच दिवसांची म्हणजेच 23 फेब्रुवारी 2018 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी वैद्यकीय तपासणी करून कुलकर्णी दाम्पत्याला ताब्यात घेतले, त्यांची उशिरापर्यंत कसून चौकशी सुरु होती, अशी माहिती पोलिस अधिकारी सूत्राने दिली आहे.

गुप्त पोलिस पथक होते डीएसकेंच्या मागावर
डीएसके चक्क मुंबई उच्च न्यायालयाचीच दिशाभूल करत असल्याचे न्यायमूर्तींच्या लक्षात आल्यानंतर न्यायमूर्ती साधना जाधव यांनी शुक्रवारी डीएसकेंना फटकारत त्यांचे अटकपूर्व संरक्षण काढून घेतले होते व त्यांची अटकपूर्व जामिनासाठीची याचिकाही फेटाळून लावली होती. त्यामुळे आपल्याला कोणत्याहीक्षणी अटक होईल, याची जाणिव डीएसकेंना होती. त्यामुळे ते पत्नीसह पुण्यातून पसार झाले होते. सर्वोच्च न्यायालयात काही हालचाल करता येईल का, याचा ते अंदाज घेत होते. या खटल्याचा एकंदरित घटनाक्रम पाहाता, पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस अगोदरच सतर्क होते. त्यामुळे त्यांनी पुणेसह मुंबई, दिल्ली येथे चार पथके तैनात केली होती. तसेच, एक गुप्त पथक डीएसकेंच्या मागावरच होते. काल ते दिल्लीतील वसंत कुंज परिसरातील डीएमसी क्लबमध्ये आल्याचे कळल्यानंतर अगोदरच तेथे असलेल्या पुणे पोलिसांच्या पथकाने डीएसके व हेमंती कुलकर्णी यांना रितसर अटक केली. त्यांना ताब्यात घेऊन विमानाने पुण्यात आणले. ससून रुग्णालयात या दाम्पत्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांची प्रकृती ठीक असल्याचे दिसून येताच सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कुलकर्णी दाम्पत्याला जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांच्यासमोर हजर करण्यात आले.

जिल्हा कोर्टात काय झाले…?
यावेळी पोलिसांच्यावतीने सरकारी वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. डीएसके यांनी अत्यंत नियोजनपूर्वक लोकांकडून पैसा गोळा केला. आणि वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत तो पैसा फिरविला. या पैशाची त्यांनी कशाप्रकारे विल्हेवाट लावली आहे, याची चौकशी करण्यासाठी पोलिस कोठडीची गरज आहे. ज्या प्रमाणे एखाद्या खुनानंतर एक कुटुंब उद्ध्वस्त होते, त्याप्रमाणे डीएसके यांनी केलेल्या आर्थिक फसवणुकीमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे कुलकर्णी दाम्पत्याला दहा दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. तर कुलकर्णी यांच्या वयाचा विचार करून त्यांना कमीत कमी दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी विनंती डीएसकेंच्या वकिलांनी केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीश उत्पात यांनी कुलकर्णी दाम्पत्याला 23 फेब्रुवारी 2018 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, न्यायाधीशांनी कुलकर्णी यांना तुम्हीच दीपक सखाराम कुलकर्णी आणि हेमंती कुलकर्णी का, अशी विचारणा केली. त्यानंतर पोलिसांनी काही त्रास तर दिला नाही ना, अशी विचारणाही केली. त्यावर डीएसके यांनी नाही, असे उत्तर दिले होते.

महत्वाचे मुद्दे
1. ठेवीदारांचे पैसे परत न करता फसवणूकप्रकरणी डीएसकेंसह हेमंती कुलकर्णींना अटक
2. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास विशेष न्यायाधीशांसमोर हजेरी, पोलिस कोठडीत रवानगी
3. डीएसकेंविरोधात आतापर्यंत 4000 तक्रारअर्ज पोलिसांकडे दाखल
5. आतापर्यंत एकूण 284 कोटी 20 लाख रुपयांची फसवणूक उघडकीस