डीएसकेंच्या पुणे, मुंबईतील घर, मालमत्तांवर छापे

0

पुणे : मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या आर्थिक शाखेने गुरुवारी पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी ऊर्फ डीएसके यांच्या पुणे व मुंबई येथील निवासस्थानांसह एकूण पाच मालमत्तांवर गुरुवारी छापे टाकले. सकाळपासून अचानक या छापेसत्रांना सुरुवात झाली होती. आर्थिक गुन्हे शाखेची पाच पथके एकाचवेळी डीएसकेंच्या पुण्यातील आलिशान निवासस्थानासह मुंबईतील कार्पोरेट कार्यालयांवरदेखील धडकले. गोखलेनगर येथील घरावर, जंगली महाराज रस्ता येथील कार्यालयावर आणि ट्रम्प टॉवरमधील फ्लॅटवर छापेमारी करण्यात आली. तर मुंबईतील अन्य एका कार्यालयातही तपासणी सुरू होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. फसवणूकप्रकरणातील कागदपत्रे, महत्वाचे व्यवहार तपासण्यासह मालमत्तांची कसून तपासणी करण्यात येत होती. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरु होती. या तपासणीतून डीएसकेच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज पोलिस लावत असून, या कारवाईवेळी 68 वर्षीय डीएसके हे कुठेही आढळून आले नाहीत. कालपर्यंत एकूण 248 गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे आपल्या तक्रारी दाखल केलेल्या आहेत. तसेच, आर्थिक फसवणुकीप्रकरणी एक तक्रार यापूर्वीच शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल झालेली आहे. त्यात डीएसकेसह त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्याविरुद्ध फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत. या प्रकरणात डीएसके व हेमंती यांना कोणत्याहीक्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
ठेवीदारांचे पैसे परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी डी. एस. कुलकर्णी व त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्याविरोधात गुन्हे दाखल केल्यानंतर आता पोलिसांकडे तक्रार देणार्‍या ठेवीदारांचा ओघ सुरू झाला आहे. बुधवारी तब्बल 258 जणांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार आर्थिक गुन्हे शाखेकडे दिली आहे. आतापर्यंत पोलिसंकडे आलेल्या तक्रारीतील रकमेची माहिती संकलित करण्याचे काम सुरू असून, ती किमान 10 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. ठेवीदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेदेखील तक्रार केली असून, त्यात विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करून डीएसके यांच्या सर्व कंपन्यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. गेल्या एक महिन्याभरापासून डी. एस. कुलकर्णी यांच्याविरोधात सर्वप्रथम शिवाजीनगर पोलिस ठाण्यात ठेवीदारांनी फसवणुकीच्या तक्रारी देण्यास सुरुवात केली होती. या तक्रारी आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आल्या. आर्थिक गुन्हे शाखेने या अर्जदारांचे जबाब नोंदविल्यानंतर 28 ऑक्टोबररोजी डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर तक्रारींचा ओघ वाढला आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या संगम पुलाजवळील कार्यालयात डी. एस. के. उद्योगसमुहाविरोधात तक्रार देणार्‍या ठेवीदारांची बुधवारी सकाळपासून गर्दी झाली होती. अहमदनगर, कोल्हापूर, ठाणे, मुंबई अशा विविध शहरांतून ठेवीदार आले होते. त्यातील बहुसंख्य हे ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी होते. त्यांनी आपल्याला मिळालेले फंड व अन्य पैसे डीएसके उद्योगसमुहात गुंतविले आहेत. त्यातील बहुसंख्य लोकांना गेल्या दीड ते दोन वर्षांपासून मुद्दल अथवा व्याजही मिळालेले नव्हते. अहमदनगरहून आलेल्या एका दाम्पत्याने सांगितले, की आम्ही आमची सर्व पुंजी 40 लाख रुपये 2004 मध्ये गुंतविली आहे़ त्याचे व्याज गेल्या 2 वर्षांपर्यंत मिळत होते़ पण, त्यानंतर मिळणे बंद झाले.

चौकशीसाठी एसआयटी नेमण्याची गुंतवणूकदारांची मागणी
पुण्यातील डीएसकेंच्या कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने गुंतवणुकदारांनी गर्दी केली असून, याठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बुधवारी तब्बल 258 जणांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार आर्थिक गुन्हे शाखेकडे दिली होती. त्यामुळे या प्रचंड तक्रारीनंतर गुरुवारी सकाळपासून पुणे पोलिस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेने डीएसके यांच्या पुणे शहरातील 4 व मुंबईतील एका ठिकाणावर छापा टाकून चौकशी व तपासणी करण्यास सुरुवात केली होती. ठेवीदारांच्या ज्या तक्रारी आल्या आहेत, त्यादृष्टीने कागदपत्रे व पुरावे हस्तगत करण्यासाठी हे छापेसत्र सुरू करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी काही गुंतवणुकदारांनी एकत्र येत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की डी. एस. कुलकर्णी यांनी घरकुल लॉन्समध्ये बोलविलेल्या बैठकीत आम्हाला त्यांच्या विविध कंपन्यांमधील मुदत ठेवींची माहिती दिली. त्यावरून आम्ही मुदत ठेवी ठेवल्या. आता ठेवींची मुदत संपण्याच्या वेळी आम्हाला माहिती देण्यात आली, की त्यांना मुद्दलाची रक्कम आणि त्यावरील व्याज परत देणे शक्य नाही. त्यामुळे आम्हाला पुढील तारीख घातलेले धनादेश स्वीकारणे भाग पडले. अनेकांशी चर्चा केल्यावर असे लक्षात आले, की डी. एस. कुलकर्णी व इतरांनी आम्हा गुंतवणुकदारांच्या समोर असे चित्र उभे केले की, त्यांना मुदत ठेवी स्वीकारण्याचा अधिकार आहे. त्यांना अधिकार नसतानाही त्यांनी आम्हाला आमिष दाखवले आणि हजारो गुंतवणुकदारांकडून प्रचंड प्रमाणात मुदत ठेव रक्कमा गोळा केल्या आणि आम्हाला फसवले आहे. स्वतंत्र एसआयटी स्थापन करून डीएसके कुटुंबाची व त्यांच्या सर्व कंपन्यांची आणि संचालकांची योग्य ती चौकशी करण्यात यावी. आम्ही सर्व गुंतवणूकदार हे मध्यमवर्गीय असून 90 टक्के हे ज्येष्ठ नागरिक आहेत. आयुष्याच्या संध्याकाळी त्यांचे उत्पन्नाचे साधन बंद झाले आहे, असेही मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद आहे.

मागील महिन्यात व्याज मिळाले
छापा पडल्याची माहिती मिळताच अनेक गुंतवणूकदारांनी डी. एस. कुलकर्णी यांच्या जंगली महाराज रस्त्यावरील कार्यालयाकडे धाव घेतली. यातील काही नागरिकांशी संवाद साधला असता, त्यापैकी एक गुंतवणूकदार महिला असलेल्या अनुराधा पाध्ये म्हणाल्या, मागील सहा वर्षापासून मी डीएसके यांच्या योजनेत पाच लाख रुपये गुंतवले आहेत. मागील मार्च महिन्यापासून मला व्याज मिळाले नव्हते, परंतु, मागील महिन्यात ते सर्व मला मिळाले. आतापर्यंत आम्हाला व्यवस्थित व्याज मिळाले आहे. यापुढेही ते मिळेल अशी मला खात्री आहे. आपण त्यांना थोडा वेळ द्यावा, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

वाईट काळात साथ देण्याची गरज
आणखी एक गुंतवणूकदार असलेले किशोर कुंभोजकर म्हणाले की, माझे दीड लाख रुपये गुंतलेले आहे. मागील वर्षभर त्यांनी व्याज दिले नाही. त्यानंतर त्यांच्याशी बोललो असता सप्टेंबरपासून मुद्दल देणार होते. परंतु, अद्यापही ते काही मिळाले नाही. विजय मल्ल्यासारखे कोट्यावधी रुपये बुडवून परदेशात पसार झाले आहेत. परंतु, डीएसके असे काही करणार नाहीत. हळूहळू का होईना त्यांनी पैसे परत करावेत. त्यांच्या वाईट काळात त्यांना साथ देण्याची गरज असल्याचे कुंभोजकर म्हणाले. याशिवाय, आणखीही काही गुंतवणूकदार निवेदिता काळे, दिलीप शाहीर यांनीही याचप्रकारची भावना व्यक्त केली.