डीएसकेंच्या मालमत्तांवरून ट्वीस्ट; बँका आणि पोलिसांनाही हवा ताबा!

0

पुणे : ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यात अपयश आल्याने फसवणुकीचे गुन्हे दाखल झालेल्या दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांच्यासह त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्या कंपन्या व मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठीचे पत्र पुणे गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने जिल्हाधिकार्‍यांसह नोंदणी महानिबंधकांना दिले आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी त्यांच्या कर्जापोटी या मालमत्ता ताब्यात घेण्याचा सपाटा लावल्याने आर्थिक गुन्हे शाखेसमोर मोठा पेच निर्माण झालेला आहे. डीएसकेंनी या मालमत्तांपोटी बँकांकडून नेमके किती खासगी कर्ज घेतले याबाबत तपास यंत्रणा अनभिज्ञ असल्याचे दिसून येते. तपासादरम्यान डीएसकेंच्या नोंदणीकृत आठ कंपन्या आढळून आल्या असून, पुण्यात स्थावर-जंगम मालमत्ता ही 1800 कोटी रुपयांची असल्याचे स्पष्ट झाले आहे. सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर कुलकर्णी दाम्पत्याला मुंबई उच्च न्यायालयातून 17 नोव्हेंबरपर्यंत तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळाला होता. या जामीनअर्जावर शुक्रवारी सुनावणी होणार असल्याने डीएसकेंच्यावतीने नियमित जामिनासाठी विनंती केली जाणार आहे.

डीएसकेंविरोधात 2400 तक्रारी
डी. एस. कुलकर्णी व हेमंती कुलकर्णी या दाम्पत्याविरोधात गुन्हे दाखल केल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने तपासाला वेग दिलेला आहे. सद्या डीएसकेंच्या आठ कंपन्यांची तपासणी करण्यात आली असून, या कंपन्यांच्या ताब्यात 1800 कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात प्रामुख्याने डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स या मुख्य कंपनीसह डी. एस. कुलकर्णी अ‍ॅण्ड असोशिएट, डीएस कुलकर्णी अ‍ॅण्ड ब्रदर्स, डीएस कुलकर्णी अ‍ॅण्ड सन्स, डीएसके अ‍ॅण्ड सन्स, डीएसके असोशिएट, डीएसके कंस्ट्रक्शन आणि डीएसके एण्टरप्रायजेस या कंपन्यांच्या ताब्यात सद्या 10 लाख चौरस मीटर भूखंड, अंदाजे 900 कोटी रुपयांची मालमत्ता (बाजारभावापेक्षा कमी) आहे. या शिवाय, फुरसुंगी येथे डीएसकेंची डीएसके ड्रीम सिटी हा प्रकल्प असून, या प्रकल्पांत सर्व कंपन्यांचे शेअर्स आहेत. या शिवाय, डीएसकेंच्या विविध प्रकल्पातील सुमारे 400 कोटी रुपयांचे फ्लॅटदेखील विकण्यात आलेले आहेत. डीएसकेंविरोधात ठेवीदारांनी सुमारे 2400 तक्रारी दाखल केल्या असून, त्याचा तपास सद्या आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. ठेवीदारांच्या हितसंरक्षणासाठी डीएसकेंच्या ताब्यात मालमत्ता सुरक्षित ठेवाव्यात यासाठी पोलिसांतर्फे जिल्हाधिकारी व नोंदणी महानिबंधकांना प्रस्ताव दिला असून, त्याबाबत अद्याप तरी या यंत्रणांची अधिकृत भूमिका कळू शकली नाही.

राष्ट्रीयकृत बँकांचे 700 कोटींचे कर्ज
पुण्यात डीएसकेंची 1800 कोटींची मालमत्ता असली तरी, डी. एस. कुलकर्णी व हेमंती कुलकर्णी यांनी विविध कंपन्यांसाठी व प्रकल्पाकरिता सुमारे 700 कोटींचे कर्ज घेतलेले आहे. त्यात प्रामुख्याने स्टेट बँक ऑफ इंडिया, टाटा कॅपिटल, इंडिया बुल्स, युनियन बँक, आयसीआयसीआय बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र या राष्ट्रीयकृत बँकांचा समावेश आहे. यापैकी बहुतांश कर्ज थकित असून, या थकित कर्जापोटी बँकांनी आपल्याकडे तारण ठेवलेली मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे तपास यंत्रणा व बँका असे दोघांमध्ये मालमत्ता जप्तीवरून ट्वीस्ट निर्माण झालेले आहे. दरम्यान, अडकलेले पैसे काढून देण्याच्या नावाखाली काही ठग ठेवीदारांना फोनही करत असल्याचा प्रकार निदर्शनास येत आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका : डीएसके
दरम्यान, डीएस कुलकर्णी यांनी फेसबुकवर स्वतःचा एक व्हिडिओ अपलोड केला असून, आपल्याबाबत पसरविल्या जाणार्‍या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन केले आहे. मी ठणठणीत असून, प्रत्येकाची देणी देण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे. लवकरच एक योजना घेऊन येत आहोत. अफवा, पोलिस केसेस यामुळे प्रचंड त्रास होत असून, कुणाचेही पैसे बुडविले जाणार नाही. जेवढी देणी आहे त्यापेक्षा जास्त मालमत्ता आहेत, त्यामुळे कुणीही काळजी करण्याचे कारण नाही, असे डीएसके म्हणाले.