पुणे : ठेवीदारांची फसवणूक केल्याचा आरोप असलेले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी उर्फ डीएसके आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांनी पुणे सत्र व जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीनअर्जावर शनिवारी न्यायाधीश जे. टी. उत्पात यांच्या न्यायालयापुढे सुनावणी झाली. यावेळी डीएसकेंच्यावतीने अॅड. श्रीकांत शिवदे व अॅड. गिरीष कुलकर्णी यांनी जोरदार युक्तिवाद केला. गुंतवणूकदारांना फसविण्याचा कोणताही इऱादा नाही. आमच्याकडे एकूण 48 लाख चौरस फूट इतकी मालमत्ता आहे. ज्यांच्या मुदतठेवीची मुदत पूर्ण झाली अशी 209 कोटींची थकबाकी आहे. जानेवारी ते ऑक्टोबरपर्यंत 30 कोटींचे वाटप केलेले आहे. 1600 नागरिकांनी आमची योजना स्वीकारली आहे. मार्च 2018 पर्यंत आम्ही सर्वांचे पैसे देऊ शकू व सर्व सुरुळीत होईल, असेही या दोन विधिज्ज्ञांनी न्यायाधीशांच्या निदर्शनास आणून दिले. सुनावणीदरम्यान सरकारी पक्ष पुरेशी तयारी न करता आल्याचे दिसून आले. त्यामुळे सरकार पक्षाने बाजू मांडण्यासाठी वेळ मागितला. त्यामुळे न्यायाधीशांनी डीएसकेसह हेमंती कुलकर्णी यांना दोन दिवस अटक न करण्याचे आदेश देत मंगळवारपर्यंत दिलासा दिला. या अटकपूर्व जामीनअर्जावर आता मंगळवारी सुनावणी घेतली जाणार आहे. दरम्यान, सरकारने मला जेलमध्ये टाकले, माझी बँक खाती गोठवली तर मी देणीकरांचे पैसे कसे देऊ, असा सवाल डीएसके यांनी उपस्थित केला आहे.
स्वतःहून पासपोर्ट जमा केला आहे!
डीएसके डेव्हलपर्स प्रा. लि.सह इतर कंपन्यांत केलेली गुंतवणूक परत मिळत नसल्याने गुंतवणूकदारांनी डीएसकेसह हेमंती कुलकर्णी यांच्याविरोधात पुणे गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाकडे तक्रारी दाखल केलेल्या आहेत. या तक्रारीवरून आर्थिक शाखेने डीएसकेंच्या पुणे आणि मुंबई येथील घर आणि कार्यालयांवर छापे टाकून महत्वपूर्ण दस्तावेज जप्त केले होते. डीएसकेंना सूचना देऊनही ते गुंतवणूकदारांचे पैसे परत देत नसल्याने पोलिसांनी डीएसकेंविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल केले होते. या गुन्ह्यात अटक होण्याची शक्यता पाहाता, डी. एस. कुलकर्णी व त्यांच्या पत्नी हेमंती यांनी वकिलांमार्फत शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर न्यायाधीश जे. टी. उत्पात यांच्या न्यायालयाने सुनावणी घेतली. यावेळी डीएसकेंचे वकील शिवदे यांनी जानेवारीपासून आतापर्यंत गुंतवणूकदारांचे 30 कोटी रुपये परत केले आहेत. मार्च 2018 पर्यंत उर्वरित 209 कोटी रुपयेही परत करू. आपण रोज पैसे परत करत असून, देशाबाहेर पळून जाणार नाही याकरिता स्वतःहून पोलिसांकडे पासपोर्ट जमा केला आहे. परंतु, मी जेलमध्ये गेलो, माझी खाती गोठवली गेली तर ठेवीदारांचे पैसे कोण परत करेल, असा सवालही डीएसकेंच्यावतीने उपस्थित करण्यात आला. सरकार पक्षाचे वकील सुनील हांडे यांनी बाजू मांडण्यासाठी वेळ मागितल्यानंतर न्यायाधीशांनी कुलकर्णी दाम्पत्याला पुढील सुनावणीपर्यंत म्हणजेच मंगळवारपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत.
डीएसके उद्योगसमूहाची 70 खाती गोठविली
ठेवीदारांच्या ठेवींचे संरक्षण करण्यासाठी या प्रकरणाचा तपास करणार्या आर्थिक गुन्हे शाखेने डीएसके उद्योगसमूहाची सुमारे 70 बँक खाती गोठवली आहेत. याशिवाय, या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवालही या शाखेतर्फे महसूल गुप्तचर विभागाचे संचालक (डीआरआय) व अमलबजावणी संचलनालय (ईडी)सह सेबीलादेखील पाठविण्यात आलेला आहे. डीएसके यांनी कोणत्याही प्रकारे त्यांच्याकडील पैसा अन्यत्र वळवू नये, यासाठी तपास यंत्रणांकडून ही काळजी घेण्यात आलेली आहे. डीएसकेंच्या पैशाचे हस्तांतरण किंवा ट्रान्स्फर होऊ नये यासाठी ईडी, डीआरआय आणि सेबीला पत्र देऊन कळविण्यात आले आहे, अशी माहिती सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली.