डीएसकेंना हायकोर्टाचा दिलासा!

0

23 नोव्हेंबरपर्यंत अटकपूर्व जामिनास मुदतवाढ

पुणे : ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यात अपयश आल्याने फसवणुकीचे गुन्हे दाखल झालेले पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) व त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना मुंबई उच्च न्यायालयाने 23 नोव्हेंबरपर्यंत दिलासा दिला आहे. या दाम्पत्याच्यावतीने दाखल करण्यात आलेल्या अटकपूर्व जामीनअर्जावर सुनावणी घेताना न्यायालयाने ठेवी परत करण्यासाठी ठोस योजना सादर करा, असे आदेश कुलकर्णी दाम्पत्याला दिले. कुलकर्णी दाम्पत्याने अटक टाळण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ज्ञ श्रीकांत शिवदे यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. परंतु, विशेष न्यायाधीशांनी हा अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर कुलकर्णी दाम्पत्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आठवडाभरात सर्व व्यवहार पूर्ण करता आले तर पहा नाही तर ठोस योजना घेऊन जामिनासाठी उभे रहा, असे निर्देश मागील सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने डीएसकेंना दिले होते. शुक्रवारी झालेल्या सुनावणीवेळी डीएसकेंच्यावतीने अ‍ॅड. अशोक मुंदरगे यांनी युक्तिवाद केला. ठोस प्रस्ताव सादर करण्यासाठी वेळ देत पुढील सुनावणी 23 नोव्हेंबरला ठेवली. तोपर्यंत अटकपूर्व जामिनाची मुदत वाढविण्याचा निर्णय न्यायालयाने दिला.

डीएसकेंविरुद्ध तक्रारींचा महापूर!
डीएसके डेव्हलपर्स प्रा. लि. कंपनीची मालमत्ता जप्त करा, अशी विनंती पुणे आर्थिक गुन्हे शाखेतर्फे महसूल विभागाकडे करण्यात आली असतानाच, ठेवीदारांच्या फसवणूकप्रकरणी गुन्हे शाखेकडे तब्बल तीन हजार तक्रारी दाखल झाल्या आहेत. प्रत्येक दिवशी सरासरी दिडशे ते दोनशे तक्रारी प्राप्त होत असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी दिली. बहुतांश तक्रारदार हे ज्येष्ठ नागरिक असून, कालपर्यंत प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार अडकलेल्या ठेवींचा आकडा 170 कोटींच्या घरात गेलेला आहे. डीएसके उद्योग समूहाच्या ताब्यातील मालमत्ता जप्त करा, त्यांच्या आर्थिक व्यवहारावर रोख लावा, अशा मागण्यांचे पत्रच तपास पथकाद्वारे महसूल विभागासह नोंदणी महानिबंधक, कंपनी नोंदणी महानिबंधक आदींना देण्यात आलेले आहे. राज्य सरकारची कारवाई व बँकांनी मालमत्ता जप्तीचा लावलेला सपाटा यामुळे गुंतवणूकदारांची देणी मिळण्यासाठी विलंब लागण्याची शक्यता असून, तात्पुरत्या अटकपूर्व जामिनावर असलेल्या डी. एस. कुलकर्णी व हेमंती कुलकर्णी यांना ठेवी परत करण्याची इच्छा असूनही आता त्यांचे कायदेशीर हात बांधले गेले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल करणारे ठेवीदार आणखीच अडचणीत सापडले आहेत.

आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयावर उसळली गर्दी
कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (सीईओपी)समोरच असलेल्या आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात डीएसकेंविरोधात तक्रारी दाखल करण्यासाठी गुंतवणूकदारांची मोठी गर्दी उसळलेली आहे. त्यात बहुतांश करून ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. कालच व्हिडिओ जारी करून मला काही दिवस मुदत द्या, अशी विनंती डीएसकेंनी ठेवीदारांना केली होती. परंतु, बँका व पोलिस मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करत असल्याने गुंतवणूकदार धास्तावलेले आहेत. त्यामुळे दिवसाकाठी दिडशे ते दोनशे गुंतवणूकदार आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी दाखल करत आहेत. कालपर्यंत तीन हजार तक्रारी दाखल झाल्या असल्याची माहिती गुन्हे शाखेतर्फे देण्यात आलेली आहे. तक्रारदार हे बहुतांश फिक्स डिपॉझिटर असून, साडेबारा टक्के व्याजदराने डीएसकेंनी त्यांच्याकडून ठेवी घेतल्या होत्या, अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच, घराचा ताबा मिळाल्यानंतर हप्ते फेडा या योजनेंतर्गतही काही ग्राहकांनी आपले पैसे भरले होते. त्यापोटी बँकांकडून त्यांना नोटिसाही आलेल्या आहेत. असे ग्राहकही आर्थिक गुन्हे शाखेकडे धाव घेत असून, आपल्या तक्रारी दाखल करत आहेत.