पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी उर्फ डीएसके हे गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणात सध्या येरवाडा तुरुंगात आहेत. त्यांच्या जप्त केलेल्या मालमत्तेच्या लिलावाची नोटीस जाहीर करण्याचे आदेश पुणे सत्र न्यायालयाने दिले आहेत. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी ईडी आणि राज्य सरकारने डीएसके यांच्या 463 स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये पुणे, वणी आणि लोणावळासह राज्यभरातील मालमत्तेचा समावेश आहे. काही महिन्यांपूर्वी डीएसकेंच्या कोट्यवधी रुपयांच्या गाड्यादेखील जप्त करण्यात आल्या होत्या. डीएसके ग्रुपने जास्त व्याजाचे आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांचे पैसे घेतले. मात्र, डीएसके ग्रुप गुंतवणूकदारांचे पैसे परत करु शकला नाही. त्यामुळे फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके यांच्या विरोधात शेकडो गुंतवणूकदरांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
डीएसके यांची मालमत्ता विक्रीतून साधारण दीड हजार कोटी रुपये वसूल होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे डीएसकेंची मालमत्ता विकून पैसे परत करावे अशी मागणी गुंतवणूकदारांकडून होत आहेत. न्यायालयाने डीएसकेंच्या मालमत्तेचा लिलावाची जाहीर नोटीस काढण्याचे आदेश दिले आहेत. डीएसकेंची मालमत्ता विकल्यानंतर सर्वात अगोदर डीएसकेंनी ज्या बॅंकेतून कर्ज घेतले होते, त्या बँकांना पैसे देण्यात येणार आहेत. त्यानंतर शिल्लक पैसे ठेवीदारांनी देण्यात येणार आहेत.
डीएसके यांनी न्यायालयात नवा प्रस्ताव सादर केला. बंद पडलेले प्रकल्प बांधकाम व्यवसाय नेमून पूर्ण करावेत. या माध्यमातून दहा हजार कोटी रुपये मिळतील, असे त्यांनी म्हटले आहे. 40 टक्के रक्कम बांधकाम व्यावसायिकाला आणि उर्वरित रक्कम गुंतवणूकदाराला द्यावी, असा प्रस्ताव त्यांनी दिला.