पुणे । ठेवीदारांकडून लाखो रुपयांच्या ठेवी जमा करून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके दाम्पत्याविरोधात गुरूवारी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. हजारो ठेवीदारांनी फसवणुकीची तक्रार दिल्यानंतर बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात डीएसकेंचा मुलगा शिरीष कुलकर्णी या आरोपीशिवाय आणखी 10 आरोपी असल्याचे निष्पन्न झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. इतर 6 आरोपी पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यातील 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यापैकी 4 आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने त्यांना 25 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
2 हजार 43 कोटी रुपयांची फसवणूक
डीएसके यांच्यावर दाखल झालेल्या आरोपपत्रामध्ये तब्बल 2 हजार 43 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. यामध्ये ठेवी आणि कर्ज स्वरूपातील 1 हजार 83.7 कोटी, वित्तीय संस्था, बँका यांच्याकडून 711.36 कोटी, कर्जरोखे याद्वारे 111.35 कोटी, फुरसुंगी येथील जमिनीच्या व्यवहारातून 136.77 कोटी असा एकूण 2 हजार 43.18 कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणानंतर आता डीएसके यांच्या मालमत्तेची जप्ती केली जाणार आहे. मात्र, ठेवीदारांचे पैसे परत कधी मिळणार हा प्रश्न निरुत्तरीत आहे. एमपीआयडी अॅक्टनुसार मालमत्ता जप्तीची कारवाई केल्यानंतर त्यातून सर्वात आधी सरकारची देणी दिली जाणार आहेत. त्यानंतर बँकांची देणी, त्यानंतर डीएसकेच्या कर्मचार्यांची देणी आणि त्यानंतर ठेवीदार असा क्रम असणार आहे.
8 पार्टनरशिप फर्म पूर्णतः फसव्या
डीएसके यांच्या या आर्थिक गैरव्यवहारांना मार्च 2000 मध्ये सुरुवात झाली होती. डीएसके डीएल पब्लिक होल्डिंग कंपनीच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी जमीन खरेदी करण्याची परवानगी त्यांना मिळाली होती. मात्र, स्वतः शेतकरी नाही असे सांगून त्यांनी नातेवाईकांकरवी त्या जमिनी खरेदी केल्या होत्या आणि त्या पुन्हा स्वत: कडे घेतल्या. तसेच अन्य 9 वेगवेगळ्या फर्म स्थापन करून डीसकेने नागरिकांकडून ठेवी जमा केल्या होत्या. यातील 8 पार्टनरशिप फर्म पूर्णतः फसव्या होत्या. डीएसकेकडे असलेल्या मागच्या ठेवीदारांच्या ठेवींवरील व्याज आणि नवीन ठेवी स्वीकारून कर्ज फेडायचे अशी योजना डीएसकेंनी आखली होती. याच काळात बँकांकडून भरमसाठ कर्ज त्यांनी उचलले तब्बल 477 कोटी 76 लाख रुपये बँकामार्फत घेतले होते. मात्र, त्यातले फक्त 150 ते 200 कोटी रूपये ड्रीमसिटीमध्ये वापरले गेले. मात्र बाकीची रक्कम सायफन ऑफ केली.
269 बँक खात्यांत फक्त 12 कोटी
डीएसके यांच्या या आर्थिक गैरव्यवहारात त्यांची पत्नी हेमंती यांचा मोठा वाटा असल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे. हेमंती कुलकर्णी यांच्याच बँक खात्यामधून मोठ्या प्रमाणात पैसा वळवण्यात आला होता. आता तो पैसा नेमका कुठे गेला याचा तपास करण्याच मोठे आव्हान पोलिसांपुढे समोर आहे. पोलीस आता त्याचा तपास करत आहेत. डीएसके कुटुंबीयांची तब्बल 269 बँक खाती आहेत. त्यात सध्या 12 कोटी रुपये इतकी रक्कम उपलब्ध आहे. मग एवढ्या मोठ्या प्रमाणात अपहार केलेला पैसा नेमका गेला कुठे, याचा कसून शोध पोलीस घेत आहेत. तसेच डीएसके कुटुंबीयांनी ड्रीम सिटी प्रकल्पासाठी बँकांतून काढलेल्या कर्जाचा पैसा हा स्वतः च्या ऐशोआरामसाठी वापरल्याची माहितीदेखील पोलीस तपासात समोर आली आहे. डीएसके दाम्पत्याने काढलेल्या कर्जाच्या रकमेतून चक्क चपला, साड्यांची खरेदी, दुधाची बिले, केटरिंगची बिले भरण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकंदरीतच हा आर्थिक फसवणुकीचा प्रकार खूप मोठा असून त्याबाबत पुढील तपासात आणखी माहिती समोर येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
या फर्मच्या नावे जमविल्या ठेवी
डी. एस. कुलकर्णी अँड कंपनी
डी. एस. कुलकर्णी अँड असोसिएट
डी. एस. कुलकर्णी अँड असो.
डी. एस. कुलकर्णी अँड इंटरप्राइज
डी. एस. कुलकर्णी अँड ब्रदर्स
डी. एस. कुलकर्णी अँड सन्स
डीएसके अँड सन्स
डीएसके डी एल लिमिटेड आणि
डीएसके कन्स्ट्रक्शन्स