पुणे : ठेवीदारांच्या सुमारे 200 कोटींपेक्षा अधिक रकमेच्या ठेवी पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी उर्फ डीएसके यांच्याकडे अडकल्या असून, याप्रकरणी पुणे पोलिसांत तक्रारी दाखल झालेल्या आहेत. तसेच, शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल झालेले आहेत. या प्रकरणात पुणे पोलिसांसह राज्य सरकारची न्यायालयात कायदेशीर बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकिलाची (एसपीपी) नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी करणारा अर्ज पुणे गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने राज्य सरकारकडे दाखल केलेला आहे. अशाप्रकारे विशेष वकिलांची नियुक्ती केली गेली तर ते सरकार पक्षाची बाजूही मांडतील व पुणे पोलिसांच्यावतीने न्यायालयात खटलाही लढवतील, अशी अपेक्षा आर्थिक गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त मिलिंद पाटील यांनी सांगितले.
राज्य सरकारला संपूर्ण माहिती सादर
डीएसकेप्रकरणात अनेक आर्थिक गैरप्रकार पुढे येत असून, या सर्व घटनाक्रमासह पुराव्यांची कायदेशीर मांडणी करावी लागणार आहे, त्यासाठी खास सरकारी वकिलांची गरज आहे. याप्रकरणी एसपीपी नियुक्त करण्यात आल्यात न्यायालयात सक्षम केस उभी करण्यासाठी पोलिसांना मोठे सहाय्य होऊ शकते. राज्य सरकारकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावात या खटल्याशी संबंधित सर्व वस्तुस्थितीची माहितीही सरकारला देण्यात आलेली आहे. तसेच, डीएसकेंविरुद्ध दाखल गुन्हे, वेगवेगळ्या ठिकाणी दाखल झालेले एफआयआर यांचीही माहिती सरकारला कळविण्यात आलेली आहे. डी. एस. कुलकर्णी यांच्यासह त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णीदेखील ठेवीदारांच्या फसवणूक प्रकरणात आरोपी आहेत. मुंबई उच्च न्यायालयात 50 कोटी रुपयांची रक्कम भरण्यात डीएसकेंना अपयश आल्यानंतर त्यांचे अटकपूर्व संरक्षण संपले होते. त्यानंतर ते सर्वोच्च न्यायालयात गेले व अटकपूर्व संरक्षण प्राप्त केले. मधील काळात पुणे पोलिसांनी त्यांच्या अटकेसाठी पुरेपूर प्रयत्न केले, परंतु डीएसके व त्यांच्या पत्नी त्यांना आढळून आल्या नव्हत्या. तसेच, त्यांचा संपर्क क्रमांकही बंद होता, अशी माहितीही पोलिसांनी दिली.
डीएसकेंच्या हालचालींवर पोलिसांचे लक्ष
एकूण 200 कोटींच्या थकित ठेवी गृहीत धरून सर्वोच्च न्यायालयाने यापैकी 25 टक्के रक्कम म्हणजे 50 कोटी रुपये मुंबई उच्च न्यायालयात भरण्यासाठी डीएसकेंना 19 जानेवारी 2018पर्यंत वेळ दिलेला आहे. या कालावधीत डीएसकेंनी पैसे भरले नाही तर त्यांचे अटकपूर्व संरक्षण आपोआप संपुष्टात येणार आहे. त्यामुळे कुलकर्णी यांच्या अटकेसाठी आर्थिक गुन्हे शाखेने कंबर कसली असली तरी 19 जानेवारीपर्यंत त्यांना काहीही हालचाल करता येणार नाही. तरीही पोलिस डीएसकेंच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत, अशी माहितीही वरिष्ठ अधिकारी सूत्राने दिली आहे. कुलकर्णी दाम्पत्याविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात 28 ऑक्टोबररोजी 420, 406 आणि 34 या भारतीय दंडविधानाच्या कलमासह महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्याच्या कलम 3 व 4 अन्वयेदेखील गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहेत.