डीएसके आणखी अडचणीत!

0

पुणे : ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यात अपयश आल्याने फसवणुकीचे गुन्हे दाखल झालेल्या डी. एस. कुलकर्णी व त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. डीएसके ग्रूपच्या कर्मचार्‍यांचे डिसेंबर 2016 ते फेब्रुवारी 2017 पर्यंत भविष्यनिर्वाह निधीची (इपीएफ) रक्कम पगारातून कपात करण्यात आली; परंतु ती पीएफ कार्यालयाकडे भरण्यातच आली नाही. तसेच, या कर्मचार्‍यांचे पगारही देण्यात आले नाहीत. पीएफची ही रक्कम जवळपास 19.06 लाख रुपये असावी, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. पीएफ कार्यालयाच्या अधिकार्‍यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात डीएसके ग्रूपविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी डीएसकेंसह चार व्यवस्थापकांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केलेले आहेत. या गुन्ह्यांचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रभाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आला होता. हे प्रकरणही आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्याच्या हालचाली पोलिस पातळीवर गतिमान झालेल्या होत्या.

पीएफ कार्यालयाच्या अधिकार्‍यांनी दिली तक्रार
याबाबत माहिती देताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रभाकर शिंदे यांनी सांगितले, की कर्मचार्‍यांच्या भविष्य निर्वाहनिधीची (पीएफ) रक्कम न भरल्याच्या तक्रारीवरून डीएसकेंसह त्यांच्या चार व्यवस्थापक दर्जाच्या अधिकार्‍यांविरुद्ध भारतीय दंडविधानाच्या कलम 406 (विश्वासघात करणे), 420 (फसवणूक करणे) यानुसार गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. डीएसके ग्रूपच्या कर्मचार्‍यांचा पीएफ त्यांच्या वेतनातून कपात करण्यात आला. परंतु, तो भविष्य निर्वाहनिधी कार्यालयाकडे जमा करण्यात आलेला नाही. ही रक्कम जवळपास 19 लाख सहा हजारांच्या घरात असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. पीएफ कार्यालयाच्या अधिकार्‍यांनी भेट घेतल्यानंतर व तशी तक्रार सादर केल्यानंतर हे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. यापूर्वी डीएसके व त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यातच जितेंद्र मुळेकर यांच्या तक्रारीवरून 28 ऑक्टोबररोजी भारतीय दंडविधानाच्या 406,402 आणि 34 कलमान्वये फसवणुकीचे गुन्हे दाखल झालेले आहेत. तसेच, तपासाअंती पोलिसांनी महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायद्याच्या विविध कलमासह 409 व 120 (ब) कलमान्वयेदेखील कुलकर्णी दाम्पत्याविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. या गुन्ह्यात कुलकर्णी दाम्पत्य उच्च न्यायालयातून तात्पुरत्या स्वरुपात मिळालेल्या अटकपूर्व जामिनावर बाहेर आहेत.

अटकपूर्व जामिनावर 23 नोव्हेंबरला सुनावणी
अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात डी. एस. कुलकर्णी व हेमंती कुलकर्णी यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीनअर्जावर न्यायालयाने 23 नोव्हेंबररोजी सुनावणी ठेवलेली असून, तोपर्यंत त्यांना अटक करू नये, असे निर्देश पोलिसांना दिलेले आहेत. सद्या तपास यंत्रणांनी डीएसकेंविरुद्ध एकूण 66 प्रकरणे दाखल केलेली असून, आर्थिक गुन्हे शाखा या सर्व प्रकरणांचा तपास करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त मिलिंद पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2800 ठेवीदारांनी गुन्हे शाखेकडे तक्रारी दाखल केलेल्या असून, ठेवीपोटी द्यावयाची रक्कम जवळपास 195 कोटींच्या घरात आहे.