ठेवीदारांकडून घेतलेला पैसा गेला कुठे? : पोलिस चक्रावले
डीएसकेंच्या 246 मालमत्तांच्या लिलावाची यादी तयार; लवकरच अधिसूचना निघणार
पुणे : ठेवीदारांच्या फसवणूकप्रकरणी अटकेत असलेले पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी उर्फ डीएसके हे ठणठण गोपाल असल्याचे पोलिस चौकशीत उघड झाले आहे. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांची व त्यांच्या कंपन्यांची तब्बल 276 खाती गोठविली होती. या खात्यांची झडती घेण्यात आली असता, त्यात केवळ 43 कोटी 9 लाख रुपयेच शिल्लक असल्याचे दिसून आले. विशेष बाब म्हणजे, त्यांच्या कंपन्यांच्या कर्मचारीवर्गाचे पगार थकले असून, भविष्यनिर्वाह निधीची रक्कमही भरण्यात आलेली नाही. त्यामुळे ही रक्कम जमा करून गुंतवणूकदारांना द्यावी की, कर्मचारीवर्गाच्या पगारासाठी ती काढू देण्यास मुभा द्यावी, असा पेचप्रसंग पोलिसांसमोर पडलेला आहे. दरम्यान, पोलिसांनी डीएसकेंच्या मालमत्तांची यादी तयार करून लिलावाच्या प्रक्रियेसाठी महसूल विभागाकडे पाठविली असून, महसूल विभागाने एकूण 246 मालमत्तांच्या लिलावाचा प्रस्ताव तयार केला आहे. त्याची अधिसूचना काढण्यासाठी गृह विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. अधिसूचना निघाली की लगचेच या मालमत्तांचा लिलाव करण्यात येऊन पैसा वसूल केला जाणार आहे. त्यातून न्यायालयाच्या आदेशान्वये प्राधान्याने बँकांची वसुली करून उर्वरित रक्कम गुंतवणूकदारांना दिली जाईल, असेही वरिष्ठस्तरीय पोलिस अधिकार्याने सांगितले.
पाच हजार गुंतवणूकदारांच्या तक्रारी, 300 कोटीने फसवणूक!
डीएसके यांच्याविरोधात आतापर्यंत दाखल झालेल्या तक्रारीवरून त्यांनी ठेवीदारांची सुमारे 300 कोटींपेक्षाअधिक रकमेची फसवणूक केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. या फसवणूकप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने डीएसके यांच्यासह त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना अटक केलेली आहे. सद्या हे दाम्पत्य न्यायालयीन कोठडीत आहेत. डीएसकेंच्या पुणेसह मुंबई, नवी दिल्ली येथील कार्यालयावर व घरांवर आर्थिक गुन्हे शाखेने छापे टाकून कागदपत्रे जप्त केली होती. त्याचवेळी या दाम्पत्यासह त्यांच्या कंपन्यांची विविध बँकांमध्ये असलेली 276 खातीही गोठविण्यात आली होती. या सर्व खात्यांची झाडाझडती पूर्ण झाली असून, त्यात केवळ 43 कोटी 9 लाख रुपये शिल्लक सापडली आहे. वास्तविक पाहाता, डीएसकेंच्याविरोधात पाच हजारांपेक्षा जास्त तक्रारदारांनी तक्रारी दिलेल्या आहेत, या तक्रारीनुसार त्यांची सुमारे 300 कोटींपेक्षा जास्त रकमेची फसवणूक झालेली आहे. तेव्हा ही रक्कम कुठे गेली? असा प्रश्न पोलिसांना पडला होता. डीएसकेंचे आर्थिक व्यवहार तपासण्यासाठी पुणे पोलिसांनी विशेष लेखापरीक्षकांची नेमणूक केली होती. त्यांनीही डीएसकेंच्या खात्यांची तपासणी करून पोलिसांना फॉरेन्सिक अहवाल सादर केला आहे. त्या अहवालातदेखील विविध खात्यांत 43 कोटीच शिल्लक असल्याचे सहाय्यक पोलिस आयुक्त नीलेश मोरे यांनी सांगितले.