डीएसके दाम्पत्य फरार?

0

पुणे : विशेष प्रतिनिधी ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यात अपयश आल्यानंतर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असलेले दीपक सखाराम कुलकर्णी व त्यांच्या पत्नी हेमंती यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, न्यायालयाने ठेवीदारांची देणी देण्यासाठी देणीपोटीची 25 टक्के रक्कम न्यायालयात जमा करा, अन्यथा अटकपूर्व संरक्षण मिळणार नाही, अशी भूमिका घेतल्यानंतर डीएसकेंनी 15 दिवसांची मुदत मागून घेतली होती. 15 दिवसांत 50 कोटी रुपये न्यायालयात जमा करतो अन्यथा स्वतःहून पोलिसांना शरण जातो, असे हमीपत्रच त्यांनी दिले होते. परंतु, ठरलेल्या मुदतीतही डीएसके पैसे भरू शकले नाहीत. त्यामुळे त्यांचे अटकपूर्व संरक्षण संपुष्टात आले असून, पोलिस कोणत्याहीक्षणी अटक करण्याची शक्यता पाहाता कुलकर्णी दाम्पत्य फरार झाले आहेत. याबाबत आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता, त्यांनी कुलकर्णी दाम्पत्याशी संपर्क होत नसल्याची माहिती दिली. दरम्यान, डीएसकेंच्या निकटवर्तीयांशी संपर्क साधला असता, अटकपूर्व जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी केली जात असल्याचे सांगण्यात आले. सर्वोच्च न्यायालयासही नाताळच्या सुट्या असल्याने तेथेही डीएसकेंची मोठी गोची झाली आहे.

हमी देऊनही पैसे भरण्यात अपयश!
डीएसके डेव्हलपर्स प्रा. लि.ने सुमारे 2774 ठेवीदारांकडून अंदाजे 209 कोटी रुपयांच्या ठेवी स्वीकारल्या असून, या ठेवी गुंतवणूकदार परत मागत आहेत. ठेवी परत मिळत नसल्याने शिवाजीनगर पोलिसांत कुलकर्णी दाम्पत्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल झालेले आहेत. एकूण पुणे, मुंबई, कोल्हापूरसह तीन एफआयआर दाखल झाले असून, पुण्याची आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहेत. महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्यानुसारदेखील डीएसकेंविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. यापूर्वी डीएसकेंसह पत्नी हेमंती कुलकर्णी यांचा अटकपूर्व जामीनअर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला असून, मुंबई उच्च न्यायालयानेही अटकपूर्व संरक्षण देण्यास नकार दिलेला आहे. डीएसकेंनी स्वतःहून मागितलेल्या मुदतीतही ते न्यायालयात 50 कोटी रुपयांची रक्कम जमा करू शकले नाहीत. तथापि, प्रसारमाध्यमांशी बोलताना कंपनीची आर्थिक परिस्थिती चांगली असून, लवकरच आपण ठेवीदारांच्या ठेवी परत करू, असे आश्‍वासन दिले होते. तथापि, महिनाभराचा कालावधी उलटला तरी ते ठेवी परत करण्यात अयशस्वी झाले आहेत. अटकपूर्व संरक्षण संपले असल्याने पुणे पोलिस डीएसकेंना अटक करण्यासाठी त्यांचा कसून शोध घेत होते.

कुलकर्णी दाम्पत्य पुण्यात नाहीत : पोलिस सूत्र
आर्थिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की डी. एस. कुलकर्णी व हेमंती कुलकर्णी यांचा शोध घेतला जात आहे. तथापि, ते मिळून आले नाहीत. तसेच, त्यांचे संपर्क क्रमांकही नॉट रिचेबल येत आहेत. त्यांना अटक करू नये, असे न्यायालयाचे आदेश नाहीत. त्यामुळे त्यांना अटक करावी लागणार असून, त्यासाठी पोलिस अधिकारी त्यांचा ठावठिकाणा शोधत असल्याचेही सांगण्यात आले. आमच्या प्राथमिक माहितीनुसार, ते पुणे शहरात नाहीत. त्यांच्या शोधासाठी सर्व प्रकारची पोलिस यंत्रणा वापरली जात आहे. ते आढळून आले की त्यांना कायद्याच्या चौकटीत अटक करण्यात येईल, असेही हे पोलिस अधिकारी म्हणाले. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात 65 वर्षीय ठेवीदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार डीएसके व हेमंती कुलकर्णी यांच्याविरोधात 28 ऑक्टोबररोजी भारतीय दंडविधानाच्या 406, 420, 409, 120 (ब) आणि 34 कलमान्वये गुन्हे दाखल असून, महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायदा (एमपीआयडी)नुसारही गुन्हे दाखल आहेत. यासह इतर दोन एफआयआरदेखील या दोघांविरुद्ध दाखल असल्याचेही पोलिसांनी सांगितले.