डीएसके पोलिस कोठडीत कोसळले!

0

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु, प्रकृती स्थीर : सूत्र

पुणे : ठेवीदारांच्या फसवणूकप्रकरणी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने पोलिस कोठडी ठोठावलेले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी उर्फ डीएसके शनिवारी मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास पोलिस कोठडीतच चक्कर येऊन कोसळले. त्यांच्या डोक्याला मारला लागला आहे. सुरुवातीला त्यांना पोलिसांनी ससून रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले. परंतु, डीएसकेंच्या वकिलांनी तातडीने न्यायालयाकडे धाव घेऊन डीएसकेंवर खासगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी मागितली. प्रकृती अस्वस्थतेचे कारण पुढे केल्याने न्यायालयानेही त्यांना पोलिस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी दिली. त्यानंतर डीएसकेंच्या वकिलांनी त्यांना कर्वेनगर येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल केले होते. तेथे त्यांच्यावर अतिवदक्षता कक्षात उपचार सुरु असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. दरम्यान, डीएसकेंना ब्रेन हॅमरेज झाले असावे, अशी माहितीही हाती आली आहे.

नेमके काय झाले पोलिस कोठडीत?
विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांनी कुलकर्णी दाम्पत्यास 23 फेब्रुवारीपर्यंत सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्यानंतर पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रात्री दहा वाजेच्या सुमारास डीएसके व त्यांच्या पत्नी हेमंती यांना पुण्यातील मध्यवर्ती लॉकअप असलेल्या विश्रामबाग येथील कारागृहात ठेवले होते. त्यांची चौकशीही करण्यात आल्याचे सांगण्यात आले. रात्री बारा वाजेच्या सुमारास डीएसके अचानक खाली कोसळले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला मार लागला. त्यांना चक्कर आल्याचा अंदाज बांधून पोलिसांनी तातडीने त्यांना जवळील सरकारी ससून रुग्णालयात दाखल केले. डीएसकेंना मधुमेहाचा आजार आहे. दिवसभराची दगदग, चौकशी यामुळे आलेला अशक्तपणा यामुळे जेवण घेतल्यानंतर त्यांना चक्कर आली असावी, व त्यामुळे ते कोसळले असावेत, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. तर वैद्यकीय सूत्राने त्यांना नैराश्यातून ब्रेन हॅमरेज झाले असावे, अशी शक्यता व्यक्त केली. ससूनमध्ये त्यांना काहीकाळ व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. सीटी स्कॅन आणि एमआरआय चाचण्यादेखील करण्यात आल्यात. या चाचण्यांचे रिपोर्ट नॉर्मल आलेले आहेत, अशी माहितीही वैद्यकीय सूत्राने दिली आहे. दरम्यान, डीएसके आता काही काळ रुग्णालयात उपचार घेणार असल्याने त्यांच्या सात दिवसांच्या पोलिस कोठडीचे न्यायालयीन कोठडीत रुपांतर करण्यात आलेले आहे. त्यामुळे पोलिस आता त्यांची चौकशी करु शकणार नाहीत.

सर्व वैद्यकीय चाचण्या सामान्य
मुंबई उच्च न्यायालयाने डीएसकेंना नोव्हेंबर महिन्यात अंतरिम जामीन देत गुंतवणूकदारांचे 50 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते. परंतु, वारंवार मुदत देऊनही डीएसकेंनी ही रक्कम जमा केली नाही. परिणामी, त्यांना अटकेपासून दिलेले संरक्षण शुक्रवारी उच्च न्यायालयाने काढून घेतले. त्यानंतर पुणे पोलिसांच्या पथकाने शनिवारी पहाटे दिल्लीतील डीएमआर सिएट हॉटेलमधून त्यांना पत्नीसह अटक केली होती. शनिवारीच सायंकाळी डीएसकेंना पुण्यात आणण्यात आले व पुणे सत्र न्यायालयात हजर केले असता, त्यांना 23 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आली होती. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास डीएसके यांना चक्कर आली आणि ते जागेवरच पडले. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त नीलेश मोरे यांनी दिली. डीएसके यांचे सीटी स्कॅन करण्यात आले असून प्रकृती स्थीर असल्याचे रूग्णालय सूत्रांनी सांगितले.

पुण्यात आणले तेव्हा ठणठणीत होते!
पुणे पोलिसांच्या पथकाने डीएसके व हेमंती कुलकर्णी यांना दिल्लीत शनिवारी पहाटे ताब्यात घेऊन विमानाने पुण्यात आणले होते. पुण्यात आणल्यानंतर ससून रुग्णालयात या दाम्पत्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. प्रकृती ठीक असल्याचे दिसून येताच सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कुलकर्णी दाम्पत्याला जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांच्यासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांच्यावतीने सरकारी वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. डीएसके यांनी अत्यंत नियोजनपूर्वक लोकांकडून पैसा गोळा केला. आणि वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत तो पैसा फिरविला. या पैशाची त्यांनी कशाप्रकारे विल्हेवाट लावली आहे, याची चौकशी करण्यासाठी पोलिस कोठडीची गरज आहे. त्यांना दहा दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. तर कुलकर्णी यांच्या वयाचा विचार करून त्यांना कमीत कमी दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी विनंती डीएसकेंच्या वकिलांनी केली होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीश उत्पात यांनी कुलकर्णी दाम्पत्याला 23 फेब्रुवारी 2018 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.