डीएसके फसविणार नाही; थोडा वेळ द्या!

0

पुणे : ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यात अपयश आलेले डी. एस. कुलकर्णी यांच्याविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल झाल्यानंतर ठेवीदार संदिग्ध असतानाच, गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी या गुंतवणूकदारांची भेट घेऊन त्यांना दिलासा देण्याचे काम करत, डीएसकेंच्या पाठीमागे आपण ठामपणे उभे असल्याचे सांगितले. दीपक सखाराम कुलकर्णी अर्थात डीएसके हे एक स्वतःच्या हिमतीवर पुढे आलेले मराठी उद्योजक आहेत. त्यांनी आजवर कुणालाही फसवलेले नाही. डीएसकेंच्याविरोधात एक अमराठी लॉबी काम करत आहे. ही लॉबी राजकीय पक्षांशी संबंधित आहे. त्यांना डीएसकेंना संपवायचे आहे. नोटाबंदी व बांधकाम क्षेत्रातील मंदीमुळे हा माणूस अडकला आहे. ठेवीदारांनी त्यांच्यावर विश्वास ठेवावा व त्यांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे, या शब्दांत ठाकरे यांनी ठेवीदारांना थोडा संयम बाळगण्याचे आवाहन केले. विशेष म्हणजे, दैनिक जनशक्तिनेदेखील सुरुवातीपासूनच ही भूमिका जाहीर करत, डीएसकेंच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहिले होते. मराठी उद्योजक असल्यानेच डीएसकेंना संपविण्याचे षडयंत्र रचण्यात आलेले आहे, याबाबतचा पर्दाफाश ‘जनशक्ति’ने यापूर्वीच प्रखडपणे केला होता. नेमकी तीच भूमिका गुरुवारी राज ठाकरे यांनी मांडली आहे.

डीएसके अन् ठेवीदारांचेही हितरक्षण झाले पाहिजे!
राज ठाकरे गुरुवारी पुणे दौर्‍यावर आल्यानंतर त्यांनी डीएसकेंमधील ठेवीदारांची भेट घेतली. तसेच त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी डीएसके यांच्या प्रकरणावर भाष्य केले. बहुतांश ठेवीदार हे मराठी मध्यमवर्गीय आहेत. गुंतवणूकदार आणि डीएसके समूह यांच्यात निर्माण झालेल्या असमंजसतेवर मार्ग निघून गुंतवणूकदारांना त्यांचा योग्य परतावा मिळावा आणि हे होत असताना एका यशस्वी मराठी उद्योजकाचा हुरूप टिकून रहावा यासाठी ही भेट घेण्यात आली आहे, असे राज यांनी स्पष्ट केले. माध्यमांमधून डीएसके उद्योगसमूहाविषयी येत असलेल्या बातम्या बघता गुंतवणूकदार अधिकच धस्तावले आहेत, त्यामुळे एक यशस्वी मराठी उद्योजक आणि मराठी गुंतवणूकदार यांच्या हितांचे रक्षण झालेच पाहिजे. त्यासाठी संवाद साधणे आवश्यक आहे, असेही राज म्हणाले.

त्रास समजू शकतो, पण डीएसकेंच्या पाठिशी उभे रहा!
या भेटीदरम्यान परांजपे बिल्डर्सचे श्रीकांत परांजपे यांनी डीएसके समूह का आणि कशामुळे अडचणीत आला असेल आणि समस्येला सोडविण्यासाठी काय काय मार्ग निघू शकतील या विषयीची तांत्रिक बाजू मांडली. तसेच बँका या परिस्थितीत गुंतवणूकदारांना काय मदत करु शकतील यासंबंधी माहिती देण्यासाठी अर्बन बँक फेडरेशनचे पदाधिकारी अनासकरदेखील यावेळी उपस्थित होते. यावेळी ठेवीदारांनी आपली बाजू राज ठाकरेंपुढे मांडली. ठाकरे यांनी गुंतवणूकदारांना डीएसके उद्योगसमूहावर विश्वास ठेवण्यास सांगितले. गुंतवणूकदारांशी संवाद साधत त्यांना डीएस कुलकर्णी सध्या अडचणीत आहेत, त्यामुळे तुम्हाला होणारा त्रास मी समजू शकतो, पण तुम्ही त्यांच्या पाठिशी उभे रहा, एका यशस्वी मराठी उद्योजकाच्या पाठिशी उभे राहण्याची हीच वेळ आहे. ते यातून बाहेर येतील आणि तुम्हाला त्यांचे पैसे नक्की मिळतील याची मला तरी खात्री वाटते. मी स्वतः डीएसके यांच्याशी बोलून त्यांना यातून लवकरात लवकर व्यवहार्य तोडगा काढण्यास सांगणार आहे, असे ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

राज यांनी शेकडो गुंतवणूकदारांशी साधला संवाद
डीएसके हे सध्या आर्थिक अडचणीत सापडले असले तरी ते फसवणूक करणार्‍यांपैकी नाहीत, आपल्या राज्यात सध्या मराठी व्यवसायिकांना संपविण्यासाठी एक लॉबी कार्यरत असून, काही राजकारणीही त्यामध्ये सामील असल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी यावेळी केला. गेल्या काही दिवसांमधे डीएसके आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णींवर फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल झाले असून, आर्थिक गुन्हे शाखा त्याचा तपास करत आहे. डीएसकेंना कर्ज देणार्‍या अनेक बँकांनी डीएसकेंच्या मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात केली आहे. या महिन्याच्या 30 तारखेला डीएसकेंच्या अटकपूर्व जामिनावर पुन्हा सुनावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर डीएसकेंच्या पाठीशी राज ठाकरे उभे राहिले आहेत. डीएसकेंच्या साडेआठ हजार हजार गुंतवणूकदारांपैकी सातशे ते आठशे गुंतवणूकदार राज ठाकरेंसोबतच्या या बैठकीला उपस्थित होते.

डीएसकेंविरोधात एक अमराठी लॉबी काम करत आहे. ही लॉबी एका राजकीय पक्षाशी संबंधित आहे. त्यांना डीएसकेंना संपवायचे आहे. मात्र, गुंतवणूकदारांनी संयम ठेवला पाहिजे. कारण या माणसाच्या सर्व मालमत्तांची किंमत नऊ-दहा हजार कोटींच्या घरात आहेत. तर, दीड-दोन हजार कोटी रूपये देणे आहे. अशी परिस्थिती असताना लोकांनी डीएसकेंच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे. तसे झाले नाही आणि डीएसकेंना तुरूंगात टाकले तर ठेवीदारांचे पैसे परत कसे मिळणार? सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा माणूस चिटर नाही.
– राज ठाकरे, मनसेप्रमुख