पुणे : डीएस कुलकर्णी डिपोजिटर्स लिमिटेड (डीएसकेडीएल)मध्ये गुंतवलेला पैसा परत मिळविण्यासाठी गुंतवणूकदार आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. तब्बल 160 गुंतवणूकदारांनी शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली होती. या गुंतवणूकदारांनी डीएसके विदेशात पळून जातील, अशी शक्यता व्यक्त करत त्यांचा पासपोर्ट तातडीने जप्त करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली असली तरी, गुन्हे दाखल करण्यास मात्र टाळाटाळ चालवली होती. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या संतापाचा उद्रेक होत आहे. दरम्यान, शिवाजीनगर पोलिसांनी डीएसकेचे अधिकारी व गुंतवणूकदारांत समेट घडविण्याचा प्रयत्नही केला. मात्र, तो अपयशी ठरला. या गुंतवणूकदारांत मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक असून, त्यांनी डीएसकेडीएलकडे आपली पुंजी गुंतवलेली आहे. सात गुंतवणूकदारांनी स्वतंत्रपणे तक्रार दाखल केली असून, पैसे परत करण्यासाठी दहा दिवसांची मुदत देऊनही पैसे परत मिळाले नसल्याचे या गुंतवणूकदारांनी सांगितले.
डीएसकेंवर आर्थिक अनियमिततेचे गंभीर आरोप
गेल्या 35 वर्षांपासून डीएसकेडीएलकडे गुंतवणूक केल्याचे गुंतवणूकदारांनी ‘जनशक्ति’शी बोलताना सांगितले. दरम्यान, डीएसकेने या गुंतवणुकीतून 485 कोटी उभे केले असल्याची बाबही या गुंतवणूकदारांनी निदर्शनास आणून दिली. पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुंतवणूकदारांचा अर्ज तूर्त चौकशीवर ठेवला आहे. गुंतवणूकदार व डीएसकेचे अधिकारी यांच्याशी पोलिस चर्चा करत आहेत. मात्र, पैसे कधी परत मिळतील, याबाबत ठोस काहीही सांगितले जात नसल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. सद्या बांधकाम व्यवसाय पूर्णपणे गळितगात्र झाला असून, त्याचा फटका डीएसकेला बसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना आपल्या ठेवीवर व्याज मिळणे तर दूरच, ठेवी परत मिळण्यासाठीही झगडावे लागत आहे. डीएसके अधिकारी व गुंतवणूकदार यांनी चर्चेतून मार्ग काढावा, असा प्रयत्न आपण केला होता, अशी माहिती शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रभाकर शिंदे यांनी दिली आहे. गुंतवणूकदारांनी जी तक्रार पोलिसांत दिली, त्यात गंभीर असे आर्थिक अनियमिततेचे आरोप करण्यात आलेले आहेत.
पैसे न मिळाल्यास गुंतवणूकदारांवर आत्महत्येची वेळ!
लोणी काळभोर येथील ड्रीम सिटी प्रोजेक्टमुळे डीएसके अडचणीत आल्याचेही गुंतवणूकदारांनी चर्चेवेळी सांगितले. 300 एकरच्या या प्रकल्पासाठी डी. एस. कुलकर्णी यांनी गुंतवणूकदारांचे पैसे गुंतवले. परंतु, हा प्रकल्प तोट्यात व नंतर कोर्टाकडून अवसायनात गेला. सद्या अनेक गुंतवणूकदारांना मुलांचे शिक्षण, विवाह, वैयक्तिक आरोग्य, कौटुंबीक गरजा यासाठी ठेवी परत हव्या असून, त्या देण्यास डीएसकेकडून टाळाटाळ होत असल्याने या गुंतवणूकदारांवर आत्महत्येची वेळ आली आहे. फिक्स डिपॉजिट योजनेत गुंतवलेला हा पैसा परत मिळत नसल्याने सुमारे 160 गुंतवणूकदारांनी पोलिसांत धाव घेतली आहे. तसेच, इतरही गुंतवणूकदार चौकशी करून जात आहेत.
डीएसकेप्रकरणाचा बांधकाम व्यवसायाला फटका!
दरम्यान, डीएसके ग्रूपवरील आर्थिक संकट लवकर दूर झाले नाही तर त्याचा सर्वाधिक फटका पुण्यातील बांधकाम व्यवसायाला बसेल, अशी शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. डीएसके यांच्यावर विश्वास ठेवून सुमारे 8 हजार गुंतवणूकदार, ठेवीदारांनी आपला पैसा गुंतवलेला आहे. डीएसकेंचा अर्थव्यवहार ठीक झाला नाही तर त्याचा फटका अशाप्रकारे प्रकल्प उभे करणारे इतर बांधकाम व्यावसायिकांना बसणार आहे. डीएसकेबद्दल पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात सद्या जी चर्चा सुरु आहे, त्यामुळे अनेक ग्राहक, गुंतवणूकदार आपले व्यवहार करण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे आधीच आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेला हा व्यवसाय आणखीच अडचणीत सापडला आहे.
ज्या गुंतवणूकदारांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्याकडून पुरावे आणि कागदपत्रे जमा करत आहोत. दोन्ही पक्षांशी चर्चा करून हे प्रकरण समोपचाराने कसे मिटवता येईल, ते पहिल्यांदा पाहात आहोत. अन्यथा, कायद्याच्या चौकटीत योग्य ती कारवाई केली जाईल.
– प्रभाकर शिंदे, पोलिस निरीक्षक शिवाजीनगर पोलिस ठाणे