पुणे : डीएसकेंच्या 301 मालमत्ता शोधून काढून त्या ताब्यात घेण्याचा अहवाल पुणे पोलिसांनी जिल्हाधिकार्यांना दिला आहे. त्यांनी पुढील कारवाईसाठी प्राधिकृत अधिकार्याची नेमणूक केली आहे. गुंतवणूकदारांच्या पैशांतून डी. एस. कुलकर्णी यांनी कोठे-कोठे गुंतवणूक केली याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी विशेष लेखापरीक्षकाची नेमणूक केली आहे. दरम्यान, 19 डिसेंबरपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार कार्यालयात 50 कोटी न भरल्यास उच्च न्यायालयाने डीएसकेंना अटकेपासून दिलेले संरक्षण आपोआप रद्द होणार आहे.
301 मालमत्ता शोधून काढल्या
आर्थिक गुन्हे शाखेने डीएसके यांनी गुंतवणूक केलेल्या 301 मालमत्ता शोधून काढल्या असून, त्यासंबंधीचा अहवाल जिल्हाधिकार्यांना सादर करण्यात आला आहे. या मालमत्तेसंबंधी पुढील कारवाई महसूल विभागाकडून करण्यात येणार आहे. जिल्हाधिकार्यांनी त्यासाठी वडगाव मावळच्या उपविभागीय अधिकार्यांची नेमणूक केली आहे. गुंतवणूकदारांच्या ठेवी परत न केल्याने दाखल झालेला फसवणुकीचा गुन्हा सध्या उच्च न्यायालयाने डी़ एस़ कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना जामिनासाठी 15 दिवसांत कोर्टात 50 कोटी रुपये भरण्याची अंतिम मुदत दिली होती.
व्यवहाराच्या हिशेबाची तपासणी
उद्या 19 डिसेंबरला सुनावणी होणार आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे या प्रकरणाचा तपास असून पोलिसांनी डीएसकेंच्या घरी तसेच विविध ठिकाणच्या कार्यालयांवर छापा घालून सर्व कागदपत्रे, विविध कंपन्यांचे ताळेबंद जप्त केले होते. त्यांच्या सर्व्हरवरील सर्व माहिती घेतली. परंतु गुंतवणूकदार व फ्लॅट घेण्यासाठी डीएसके यांच्याकडे दिलेल्या पैशांचे नेमके काय झाले, पैसे नेमके कोठे गेले, या व्यवहाराच्या हिशेबाची तपासणी करण्यासाठी पुणे पोलिसांना लेखापरीक्षकांची मदत आवश्यक होती. त्यासाठी पोलिसांनी चार्टर्ड अकाउंटंटची नेमणूक केली आहे. डीएसके यांच्याशी संबंधित कागदपत्रे, ताळेबंद याची पडताळणी करून त्याचा अहवाल ते पोलिसांना देणार आहेत.
मालमत्ता सील होणार
आर्थिक गुन्हे शाखेने शोधून काढलेल्या डीएसकेंच्या मालमत्तांवर जप्ती आणण्यासाठी महसूल प्रशासनासह न्यायालयाकडे अर्जही केला होता. त्यानंतर गेल्या काही दिवसांत आणखी मालमत्ता शोधण्यात गुन्हे शाखेला यश आले असून, त्याही सील करण्यासाठी अर्ज करण्यात येणार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठस्तरीय सूत्राने दिली. त्याबाबतचा निर्णय 19 तारखेच्या सुनावणीनंतर घेतला जाणार आहे. दरम्यान, ठेवीदारांनी थोडा संयम ठेवावा. आणखी तक्रारी दाखल करू नयेत, अशी विनंतीही डीएसकेंच्यावतीने ठेवीदारांना करण्यात आली होती. आपण सर्व ठेवी परत करणार आहोत. पैशाची जुळवाजुळव करण्यात वेळ लागत आहे, अशी विनंतीही डीएसकेंनी केली होती.