नवी दिल्ली : सीबीआयने व्यापारी मोईन कुरेशी प्रकरणी आपलाच अधिकारी डीएसपी देवेंद्र कुमार यांना काल अटक केली होती. कुमार यांना आज पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी सीबीआयने कुमार यांची 10 दिवसांच्या कोठडीची तर कुमार यांच्या वकिलाने जामिनाची मागणी केली.
सीबीआयचे नंबर दोनचे अधिकारी राकेश अस्थाना यांनीही न्यायालयात शरणागती पत्करली असून दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी आपल्याविरोधात दाखल केलेला एफआयआर रद्द करण्यासह कोणतीही मोठी कारवाई न करण्याची मागणी केली आहे.
अस्थाना यांनी कुरेशी प्रकरणात चौकशी करत असलेल्या आरोपीकडून 2 कोटींची लाच घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सीबीआयने स्वत:च्याच मुख्यालयात छापे टाकले होते. यावेळी देवेंद्र कुमारकडून 8 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. देवेंद्र यांच्या घरावरही रविवारी छापा टाकण्यात आला होता. आरोपी सना याने अस्थाना यांनी 2 कोटी रुपयांची लाच घेतल्याची माहिती चौकशीवेळी दिली होती. यानंतर कुमार याने हा जबाब फिरवून त्याचा दिल्लीत जबाब नोंदवल्याचे म्हटले होते. मात्र, सना या दिवशी हैदराबादला होता. सीबीआयने 16 ऑक्टोबरला दुबईहून परतणारा दलाल मनोज प्रसाद याला ताब्यात घेतले होते.