डीजीधन मेळाव्याचे आयोजन

0

जळगाव । नागपूर येथे येत्या 14 एप्रिल रोजी देशातील 100 व्या डीजीधन मेळाव्याचे आयोजन होत आहे. राज्यातही डिजीटल आर्थिक व्यवहारांसंदर्भात 14 रोजी मोठ्याप्रमाणावर जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. यानिमित्त जळगाव जिल्हाप्रशासनाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याच दिवसापासून शुक्रवार 14 ऑगस्ट पर्यंत डिजीटल आर्थिक व्यवहारांसंदर्भात राज्यस्तरीय प्रचार अभियानाचीही सुरुवात होणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सुनिल दामले, जिल्हा सुचना केंद्राचे बोरोले, नाबार्ड बँकेचे सोमवंशी, ग्रामिण प्रशिक्षण केंद्राचे एस.एस. इखारे, तसेच विविध बँकांचे प्रमुख अधिकारी आदी उपस्थित होते.

डिजीटल व्यवहारासाठी मान्यवरांकडून होणार नागरीकांना मार्गदर्शन
नागरिकांना डिजीटल आर्थिक व्यवहारासाठी सुविधा उपलब्ध करुन देणे, त्यासंबंधित तंत्रज्ञानाविषयी जागृती निर्माण करणं या दृष्टीने या मेळाव्यांत आधार नोंदणी, आधार क्रमांकाचे व मोबाईल क्रमांकाचे बँक खात्याशी संलग्नीकरण करणे, डिजीटल आर्थिक व्यवहारांच्या साधनांची ओळख करुन देणे, विविध प्रकारचे मोबाईल, कार्डस यांचा वापर याबाबत माहिती देण्यासाठी या मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत असते. नागपूर येथे होत असलेल्या 100 व्या डिजीधन मेळाव्याच्या अनुषंगाने गाव, तालुका आणि जिल्हापातळीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रपर निबंध स्पर्धा, भारतीय राज्यघटनेसंदर्भात प्रश्नमंजूषा, डिजीटल आर्थिक व्यवहारांसंदर्भात जनजागृतीपर चर्चा, घोषवाक्ये, आधारसंलग्निकरणाचे फायदे आदींविषयी व्याखाने आदींचे आयोजन करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातही मेळाव्याचे आयोजन
यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी पार्श्वभूमि सांगितली की, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशात डिजीटल आर्थिक व्यवहाराला चालना देण्यात येत असून त्यासंदर्भात मोठ्याप्रमाणावर जनजागृती राबविण्यात येत आहे. यासाठी डिजीटल आर्थिक व्यवहारांबाबत साक्षरता निर्माण करणे, यासाठी देशभरात विविध ठिकाणी डिजीधन मेळावे आयोजित करण्यात आले. 25 डिसेंबर 2016 पासून या उपक्रमाची सुरुवात झाली. महाराष्ट्रातही मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि नांदेड या ठिकाणी डिजीधन मेळावे यापूर्वीच आयोजित करण्यात आले आहेत. याच अंतर्गत नागपूर येथे 14 रोजी 100 वा डिजीधन मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे स्वतः उपस्थित राहुन संबोधित करणार आहेत.

सर्वपक्षियांचा कार्यक्रमात सहभाग
या कार्यक्रमात मान्यवर संसद सदस्य, विधानसभा सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्था सदस्य आदींचा सहभाग राहणार आहे. प्रत्येक बँकांनी आपले खातेदार असणार्‍या किमान दहा व्यापार्‍यांना डिजीटल आर्थिक सुविधा उपलब्ध करुन द्यावी. त्याची सुरुवात याच दिवशी करावी. यानिमित्त 14 एप्रिल ते 14 ऑगस्ट दरम्यान राज्यव्यापी अभियान राबविण्यात येणार आहे. त्यात शून्य ते 6 वर्षे, 6 ते 18 वर्षे आणि 18 वर्षांपेक्षा अधिक या तीन गटात विभागणी करुन 100 टक्के आधार नोंदणी करणे, प्रत्येक आधार कार्डधारकाचे बँक खाते व प्रत्येक बँक खात्याचे आधार संलग्नीकरण, आधार आणि मोबाईल क्रमांकाचे संलग्निकरण, अंगणवाडी, शाळा, आपले सरकार सेवा केंद्र याठिकाणी आधार नोंदणी सुविधा उपलब्ध करणे आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

नियोजन सभागृहात कार्यक्रम
यानिमित्त जळगाव येथे 14 रोजी सकाळी 10 वाजेपासून नियोजन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन, संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन, मान्यवरांचे मार्गदर्शन आणि दुपारी सव्वा बारा वाजेपासून नागपूर येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे थेट प्रसारण उपस्थितांना सभागृहात दूरचित्रवाणीच्या माध्यमातून दाखविले जाणार आहे. याच प्रमाणे जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायती, पंचायत समित्या आदी ठिकाणीही थेट प्रसारण दाखविण्याची सोय केली जाणार आहे. या उप्रकमात जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले आहे.